देवगड : येत्या हिवाळी अधिवेशनात वानिवडे-मोंड पुलासंदर्भात कोणतीही कार्यवाही करता येणार नसली तरी मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आवश्यक ती प्रशासकीय मंजुरी तसेच बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वानिवडे येथे उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. गेली १६ वर्षे वारंवार मागणी करूनही या वानिवडे-मोंड पुलाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या भागातील सिंधुसेवा प्रबोधिनी संस्थेच्यावतीने वानिवडे खाडीपात्रात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणस्थळी पालकमंत्र्यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख विलास साळसकर, प्रकाश परब, सरपंच दत्ताराम कोतेकर, पपू लाड उपस्थित होते. सकाळी अकरा वाजल्यापासून वानिवडे खाडीपात्रात सुरू झालेल्या या लाक्षणिक उपोषणास देवगड पंचायत समिती सभापती डॉ. मनोज सारंग यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, उपसभापती स्मिता राणे, माजी सभापती राजाराम राणे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी मुंबई येथून दूरध्वनीद्वारे पाठिंबा व्यक्त केला. यावेळी डॉ. मनोज सारंग यांनी उपोषणकर्त्यांना आपली मागणी आमदार नीतेश राणे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर हा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याकरिता विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. संदेश पारकर यांची भेट कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट देऊन उपोषकर्त्यांशी चर्चा केली व तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. जी. पवार, शाखा अभियंता तांबे, पाटील यांच्याकडून या पुलाचा आराखडा व अन्य माहिती घेऊन प्रशासकीय मंजुरी बाकी असल्याचे स्पष्ट केले. या नियोजित पुलाकरिता सात कोटी २० लाख रुपये अंदाजित खर्च असून, पुलाच्या संदर्भात ग्रामस्थांसमवेत बांधकाममंत्री व अन्य मंत्री महोदयांसमवेत भेट घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यापुढेही आपल्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनीही पाठिंबा व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. उपोषणास सिंधुसेवा प्रबोधिनी अध्यक्ष रमेश सरवणकर, बब्रुवान सरवणकर, श्रीविद्या सरवणकर, धर्मेद्र भाबल, सुंदर सरवणकर, रमाकांत सरवणकर, गजानन करंजे, सुशांत सरवणकर, स्वागता सरवणकर, महेश बांदेकर, मनोहर सावंत, गणेश हरम, गोविंद सावंत, प्रभाकर घाडी, निधी आडवलकर, रफीक नाईक, चांद रहीम झारी, वसंत घाडी, प्रवीण सरवणकर, रंजना कदम यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक वयोवृद्ध, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. उपोषणस्थळी देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. नायब तहसीलदार विलास जाधव यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वानिवडे- मोंड पुलाचा प्रश्न अधिवेशनात मार्गी लावू
By admin | Published: September 20, 2015 12:12 AM