रत्नागिरी : आजच्या पिढीतील मुले अधिक चौकस आहेत, स्मार्ट आहेत. त्यांना खूप बोलायचं आहे. पण त्यांना शाळेतही बोलायची संधी मिळत नाही आणि त्यांना देण्यासाठी पालकांकडे वेळच नाही. खूप काही बोलायचे असलेल्या या मुलांची घुसमट होते आणि कधीतरी त्याचा स्फोट होतो. त्यातून अनर्थ घडतो. हे प्रमाण कमी करायचे असेल आणि मुलांची निकोप वाढ होणे आवश्यक असेल, तर पालकांनी मुलांशी बोलायला हवे, मुलांचे ऐकण्यासाठी वेळ द्यायला हवा, अशी मते रत्नागिरीतील मान्यवरांनी मांडली. निमित्त होते, ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परिचर्चेचे.बदलती सामाजिक परिस्थिती, त्याचा मुलांवर होणारा परिणाम, मुलांच्या वाढलेल्या आत्महत्या याविषयी ‘लोकमत’ने परिचर्चा उपक्रमाचे आयोजन केले होते. यात फाटक प्रशालेच्या वरिष्ठ शिक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर, निवृत्त क्रीडा शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नाना मुजुमदार, प्रख्यात समुपदेशक सचिन सारोळकर आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर सहभागी झाले होते.परिस्थिती बदलते आहे. आजच्या पिढीतील मुले बौद्धिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत. पण त्यांना ऐकून घेणारे कोणीच नाही. पालकांना मुलांसाठी वेळ नाही, ही फक्त महानगरांमधील स्थिती नाही. छोट्या शहरांमध्येही आता आईवडील दोघेही नोकऱ्या करतात. त्यामुळे मुलाला जाणूून घेण्याइतका वेळच त्यांच्याकडे नाही.गेल्या तीन वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात सात मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वसाधारणपणे कुठलीही आत्महत्या एखाद्या घटनेच्या उद्रेकातून होत नाही. मुलांच्या मनात खूप काही साचत जाते आणि त्याचा स्फोट होर्ईल, अशी एखादी घटना घडते. जिथे पालक आणि मुलांमध्ये संवाद आहे, अशा ठिकाणी ही समस्या दिसत नाही. मुलांच्या भावविश्वात सहभागी होणे, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेणे, त्यांच्यातील बदल टिपणे या गोष्टी पालक आणि शिक्षकांनी करायला हव्यात. त्यासाठी पालकांचा मुलांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी संपर्क हवा. मुलाच्या गॅदरिंगला नटून जाणारे पालक शाळेत पालक सभेला मात्र हजर नसतात, हे दुर्दैवी आहे, असा सूरही या परिचर्चेतून उमटला. संवाद हेच उत्तम माध्यम असल्याचे मत मान्यवरांनी मांडले. (प्रतिनिधी)मुलांना खूप बोलायचं असतं. मात्र, त्यांना व्यक्त होण्यासाठी, त्यांच्या भावना मांडण्यासाठी त्यांना शाळेकडे व्यासपीठ नाही. त्यामुळे त्यांच्या या भावनांचा निचरा योग्यरित्या होत नाही. आपण त्यांना गृहित धरतो. यासाठी शाळांमध्ये समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी शाळा - शाळांंमध्ये ‘कौन्सिलर’ असायला हवा. शाळेतील शिक्षेचे स्वरूपही चुकीचे आहे. यासाठी कितीतरी अशी तंत्र आहेत की जी वापरता येतील. मुलांना शाळेमध्ये पाच-पाच मिनिटांचा ‘ब्रेक’ दिल्यास ती ताणविरहीत जगू शकतील. मधला तास असा गेला की त्यांना शिक्षण आनंददायी वाटेल. मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. पण पालकांच्या ‘प्रायोरिटी’ वेगळ्या असतात. त्यामुळे पालकांच्या ‘नंतर बोलू, नंतर बोलू’ या भूमिकेमुळे मुलाला जे सांगायचेय ते राहूनच जाते आणि मग त्याचा विस्फोट वेगळ्या तऱ्हेने होतो. मुलांच्या या भावभावना समजून घ्यायला हव्यात. मुलींच्या वयात येण्याच्या शारीरिक बदलांविषयी आपण समजून घेतो. पण मुलांच्या वयात येण्याच्या शारीरिक बदलांबाबत, त्याच्या या वयातील आक्रमकतेबाबत पिता म्हणून आपण समजून घेतो का? आपण सरसकट त्याला उर्मट, हट्टी अशी ‘लेबल’ लावून टाकतो. मुलांना ‘लेबलायझेशन’ केलेले आवडत नाही. सोशल नेटवर्किंग गतिमान जीवनाचा भाग आहे. तो टाळता येणार नाही. त्यामुळे मुलांना यापासून अलिप्त ठेवताही येणार नाही. मात्र, हे घडत असताना या वयातील त्यांच्या भावभावना समजून घ्यायला हव्यात.- सचिन सारोळकर, मानसशास्त्रज्ञ, रत्नागिरीशाळेमध्ये सर्वस्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. सोशल मीडियाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर अधिक आहे. टी. व्ही., मोबाईल, इंटरनेटसारख्या वस्तूंशी सातत्याने संपर्क येत असतो. पालकांना देखील आपल्या पाल्यांना मोबाईलमधील खूप काही कळतं याच कौतुक अधिक असतं. सात ते बारा वयोगटातील मुलांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. मुलींचेही वयात येण्याचे प्रमाण लवकर आहे. अशावेळी आईला मुलींच्या मनोव्यापाराची कल्पना नसते. शिवाय ‘निखळ’ मैत्रीची संकल्पनादेखील बदलली आहे. शारीरिक आकर्षण वाढत आहे. मित्र, मैत्रिणी अथवा समवयस्कांमध्ये खेळाचे स्वरूप बदलले आहे. मुलांची भाषा, वर्तन झपाट्याने बदलत आहे. पालक भौतिक गोष्टीची उपलब्धता पाल्यांना करून देत आहेत, परंतु, पाहिजे ते संस्कार मात्र होत नाहीत. करियरच्या मागे धावणारे पालक व दिवसभर कामासाठी घराबाहेर असणाऱ्या पालकांचे मुलांवर दुर्लक्ष होत आहे. मनोवृत्ती बिघडत आहे. शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती जबाबदारी आहे परंतु किती? बदलती शैक्षणिक धोरणे याचादेखील परिणाम होत आहे. पेपर पॅटर्न बदलला आहे. पाठांतर मर्यादित आहे. नववीमध्ये तर १५ विषय आहेत. अभ्यासाचा ताण वाटतो. परंतु, त्यासाठी तयारी करण्याची त्यांची तयारी नाही. पालकांनी वेळीच आपल्या पाल्यांवर लक्ष केंद्रीत केले, शिक्षकांशी सुसंवाद साधला तर नक्कीच सकारात्मक परिणाम होतील. पालकांनी मित्र बनून संवाद साधणे गरजेचे आहे.-दाक्षायणी बोपर्डीकर, शिक्षिका, रत्नागिरीमुलांचा घरातील संवाद तुटला आहे. घरात पालकांशी संवाद होत नसल्याने मुलाच्या भावनांचा कोंडमारा होतो. पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत मुलांना बोलते करणारे परिपाठ असायचे. पण आता ते चित्र दिसत नाहीत. शाळेत मुल्यमापनाचे गुणही खरे दिले जात नाहीत. मुलांचे प्रोजेक्ट मुलांकडून करून घेण्याऐवजी पालकच ते पूर्ण करतात. मुलांशी बोलण्यासाठी पालकांनाच वेळ नाही. घरातील चर्चा आज थांबली आहे. घरात लैंगिक शिक्षण देणे निषिद्ध मानले जाते. मुलांनी स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी, त्याच्या मित्रांनी प्रयत्न करायला हवेत. मुले तल्लख बुद्धिमत्तेची आहेत. त्यामुळे त्यांच्यातील भावभावनांची घुसमट विचित्र पद्धतीने होत आहे. या परिस्थितीत शिक्षक, पालक यांचा मुलांशी संवाद सातत्याने होणे गरजेचे आहे.- नाना मुजुमदार, निवृत्त क्रीडाशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते, रत्नागिरीबदलत्या काळाचा महिमा आपण पाहत आहोत. त्यामुळे चांगल्या-वाईट घटना जवळून पाहायला मिळतात. आताची मुले ‘स्मार्ट’, ‘हुशार’ आहेत. भावनिकदृष्ट्या कमकुवत होण्यास आपणच जबाबदार आहोत. योग्य, अयोग्य गोष्टींचे मुलांकडून निरीक्षण सुरू असते. स्वत:च्या बौध्दिक पातळीवर काहीवेळा अयोग्य अर्थ काढला जातो व चुकीच्या गोष्टी घडतात. पुनरावृत्तीचे अनुकरण करतात. मुलांना वेळोवेळी व्यक्त होऊ देणे गरजेचे आहे. १२ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक, बौध्दिक, भावनिक विकास होतो, त्यावेळी आंतरीक अस्वस्थता असते. अशावेळी आई मुलींबाबत कमालीची जागृत असते. वडिलांनीदेखील मुलांशी संवाद साधला पाहिजे. मात्र, संवाद होत नसल्यामुळे समवस्कांशी वळतात. अनेकवेळा चुकीच्या माहितीमुळे त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. अनेक शाळा चांगले उपक्रम राबवित असल्या तरी राजकीय जवळीक असलेल्या पालकांकडून दबाव आणून त्याचा बट्ट्याबोळ केला जातो. - डॉ. कृष्णा पेवेकर, मानसोपचारतज्ज्ञ, रत्नागिरीबालविश्वाला हादरवतायत आत्महत्याशोभना कांबळे ल्ल रत्नागिरीमोबाईल, टी. व्ही., कॉम्प्युटर यांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना बाहेर कसे काढायचे, या चिंतेत पालकवर्ग अडकलेला आहे. त्यातच आता किशोरवयीन मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागल्याची भर पडल्याने पालकवर्ग अधिकच विवंचनेत अडकला आहे. जिल्ह््यात गेल्या तीन वर्षात सात मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने त्यामागची कारणे शोधण्याचे नवे आव्हान पालकांबरोबरच समाजासमोर सध्या उभे आहे.टी. व्ही., संगणक यांच्याबरोबरच आता तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून निर्माण झालेल्या सोशल नेटवर्किंगची किमया सर्वत्रच दिसून येत आहे. सध्या तर अगदी बालकापासून वयोवृद्ध नको तितके इंटरनेटच्या आहारी गेल्याचे चित्र अगदी सर्वत्रच दिसत आहे. लहान मुले तर या गर्तेत अधिकच अडकली आहेत. ज्यांचे पालक नोकरी - धंद्यानिमित्त बाहेर आहेत, अशांना तर आपल्या मुलांच्या या आहारी जाण्याची चिंता अधिक सतावत आहे.नव्या पिढीच्या या आहारी जाण्याची चिंता व्यक्त होत असतानाच जिल्ह््यात अगदी ८ वर्षे ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांच्या आत्महत्यांनी अधिकच हादरवून सोडले आहे. २०१४ ते मार्च २०१७ या कालावधीत या वयोगटातील सहा मुलांनी आत्महत्या केली आहे. बारावी परीक्षेची भीती, उशिरा येण्यावरून पालकांनी विचारणा केली म्हणून, पालकांना शाळेत बोलाविले म्हणून अशी अनेक कारणे पोलिसांसमोर देण्यात आली तर काहींचे कारण गुलदस्त्यातच आहे. कोवळ्या वयातील मुलांनी वैफल्यग्रस्त होऊन विषप्राशन करून, गळफास घेऊन, पेटवून घेऊन केलेल्या या आत्महत्यांंनी समाजासमोर सध्या मोठे आव्हान उभे केले आहे. नवी पिढी अतिशय तल्लख बुद्धिची आहे. त्यामुळे त्यांच्या या अफाट बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा उपयोग योग्यरितीने करता येण्यासारखा आहे. मात्र, अगदी आठव्या - दहाव्या वर्षीच ज्यांना जीवनाची साधी ओळखही झालेली नाही, अशा मुलांंच्या मनात आपले आयुष्य संपविण्याचे विचार थैमान घालत असतील तर वेळीच त्यांच्या या समस्यांमागचे मूळ शोधून त्यांना परावृत्त करावे लागणार आहे.यादृष्टीने या आत्महत्यांची कारणमिमांसा शोधून त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी समाजातील विशिष्ट घटकांनी उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.२०१४ मध्ये दोन मुलांनी आत्महत्या केल्या. या दोन्ही मुलांच्या आत्महत्येचे कारण कळलेच नाही. २०१५ मध्येही दोन मुलांच्या आतम्हत्या झाल्या. यात एकाने परीक्षेचे दडपण आल्याने तर दुसऱ्या आत्महत्येचे कारण उशिरा आल्याचा जाब पालकांनी विचारला म्हणून नमूद करण्यात आले आहे. २०१६मध्ये झालेल्या एका आत्महत्येमागे परीक्षेला वेळ झाला म्हणून हे कारण नमूद केले आहे तर दुसऱ्या आत्महत्येचे कारणच गुलदस्त्यात राहिले. २०१७ च्या प्रारंभीच मुलाने केलेल्या आत्महत्येमागे पालकांना शाळेत बोलावल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे. ही कारणे पाहता, यामुळे या मुलांमध्ये एवढे वैफल्य येऊन ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतात का, असे मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे.
मुलांना बोलायचंय, पालकांना वेळच नाही
By admin | Published: March 18, 2017 10:38 PM