बांदा : शेर्ले तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उत्खननाचा ह्यरात्रीस खेळ चालेह्ण सुरू आहे. अनेक तक्रारी करूनही संबंधित महसूल विभागाकडून त्यांना सवलत दिल्याचे दिसून येत असल्याचा आरोप शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी केला आहे.
नदीपात्रात रात्रीच्यावेळी दहा ते पंधरा परप्रांतीय कामगार वाळू उपसा करीत आहेत. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी लेखी तक्रारी देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. सुरू असलेल्या बेकायदा वाळू उत्खननावर येत्या दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धुरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.तेरेखोल नदीकिनारी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूचा बेकायदा उपसा करण्याची चर्चा परिसरात सुरू आहे. यासाठी परप्रांतीय कामगारांचा वापर करून हजारो ब्रास वाळू उचलली जाते. गेल्या काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाने कारवाईचा दिखाऊपणा केल्याचा प्रकार उघड झाला होता. ६ ब्रास वाळू नदीतीरावर जप्त केली होती. वाळू व्यावसायिकांनी दुसऱ्याच दिवशी ती वाळू गायब केली. याबाबत महसूल विभागाला कळवूनही काहीही उपयोग झाला नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्याम सावंत यांनी सांगितले.या नदीपात्रातून दिवस-रात्र वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे. याबाबत स्थानिकांनी या व्यावसायिकांकडे विचारणा केली असता स्थानिकांना दमदाटी करण्यात येते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रालगतची जमीन कोसळू लागल्याने याचा फटका शेती-बागायतींना बसला आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच हे व्यावसायिक बिनधास्त असल्याचा आरोप धुरी यांनी केला.बुधवारी सायंकाळी सरपंच उदय धुरी यांनी तेरेखोल नदीपात्रातील वाळू उपशाचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांनी मडुरा महसूल मंडळ अधिकारी ए. वाय. पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कारवाई करण्याची मागणी केली. मात्र पवार यांनी रात्री न येता गुरुवारी सकाळी येऊन समक्ष पाहणी करण्याचे आश्वासन सरपंच धुरी यांना दिले.यावेळी पोलीस पाटील विश्राम जाधव, लवू सावळ, अमोल धुरी, रजत धुरी, भूषण रूपजी आदी उपस्थित होते. महसूल प्रशासनाने येत्या दोन दिवसांत बेकायदा वाळू उपशाविरोधात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धुरी यांनी यावेळी दिला.