मालवण (सिंधुदुर्ग) : मालवणवासीयांना अभिमानाची गोष्ट ठरलेल्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे भारतीय नौदलाने गुरुवारी कोची येथे आयोजित कार्यक्रमात जलावतरण केले. पाणबुडीविरोधी कारवायांबरोबरच अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज अशी ही नौका असणार आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमापूर्वीच मालवणचा सन्मान झाल्याने जिल्हावासीयांसाठी ते भूषणावह ठरणार आहे.या युद्धनौकेबरोबरच माहे आणि मंगरोळ या दोन नौकांचेही त्याचवेळी जलावतरण करण्यात आले. भारतीय नौदलासाठी कोची शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल, कोची)कडून पाणबुडी अवरोधक उथळ जलस्तरीय सागरयुद्ध प्रकल्पांतर्गत या पहिल्या तीन नौकांचे काम हाती घेण्यात होते.सागरी परंपरेला अनुसरून, तीनही नौकांचे विधिवत अथर्ववेदाच्या आवाहनात समुद्रात जलावतरण करण्यात आले. मालवण या नौकेचे व्हाइस एडमिरल सूरज बेरी, सी-इन-सी यांच्या उपस्थितीत कंगना बेरी यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. यावेळी नौसेना उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय जे. सिंह, व्हाईस ॲडमिरल कमांडेंट आईएनए, पुनीत बहल, अंजली बहल, जरिन लॉर्ड सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
बंदरांच्या आरमारी इतिहासाचे स्मरणमाहे श्रेणीतील या पाणबुडी अवरोधक उथळ जलस्तरीय सागरयुद्ध, शॅलो वॉटर क्राफ्ट्सचे नामकरण भारताच्या किनारपट्टीवरील मोक्याच्या आणि महत्त्वाच्या बंदरांच्या नावावरून करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदरांना असलेला आरमारी युद्धनौकांचा गौरवशाली इतिहास सर्वांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्णसंरक्षण मंत्रालय आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्यात ३० एप्रिल २०१९ रोजी आठ अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट जहाजे बांधण्याचा करार करण्यात आला होता. माहे श्रेणीतील ही जहाजे स्वदेशी विकसित आणि अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज असतील. या नौकांचा उपयोग समुद्राच्या पाण्यात पाणबुडीविरोधी कारवायांबरोबरच कमी तीव्रतेचे समुद्री ऑपरेशन्स (LIMO) आणि माइन लेइंग ऑपरेशन्ससाठी होणार आहे.जलावतरण करण्यात आलेल्या अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट ७८ मीटर लांब असून, कमाल वेग २६ नॉट्स आहे. आणि त्यांचा विस्थपण अंदाजे ९०० टन आहे.
युद्धनौका बांधणीत आत्मनिर्भर भारतएकाच वर्गातील तीन जहाजांची एकाचवेळी बांधणी हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया’ वचनबद्धतेला बळकटी देणारे आहे. या प्रकल्पांतर्गत पहिली नौका २०२४ मध्ये वितरित करण्याचे नियोजित आहे. अँटि-सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट जहाजामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री आहे. ज्यामुळे भारतीय उत्पादन युनिट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन कार्यान्वित केले जाईल. देशात रोजगार निर्माण होईल आणि क्षमता वाढेल.