ओरोस : नूतन जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभापती माधुरी बांदेकर यांची पहिलीच समिती सभा तब्बल एक तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे सभेला उपस्थित असलेल्या तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक तास ताटकळत रहावे लागले. तसेच त्यांच्या कामाचा एक तास वाया गेला.
जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्या संपदा देसाई, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, पल्लवी झिमाळ, वर्षा कुडाळकर, तालुका बाल प्रकल्प अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समिती सभापतीपदी माधुरी बांदेकर यांची निवड झाल्यानंतर बुधवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच तहकूब सभा आयोजित करण्यात आली होती. ११.३० वाजता सभा असल्याने अधिकारी व खातेप्रमुख वेळीच सभागृहात उपस्थित होते. तर सभापती व अन्य सदस्य सभापती यांच्या दालनात उपस्थित होते.
मात्र, सभापती आणि सदस्य तब्बल एक तास उशिराने सभागृहात दाखल होत सभेचे कामकाज पूर्ण केले. मात्र, सभापती बांदेकर यांनी पहिलीच सभा विलंबाने सुरू केल्याने सभेला उपस्थित असलेल्या तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक तास ताटकळत रहावे लागले. तसेच आपला कामाचा एक तास वाया गेला अशी कुजबूज सुरू होती.
महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत फळ प्रक्रिया प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात दोन प्रस्ताव प्राप्त होते. यात कोल्हापूर येथील संस्थेचे दर कमी होते. मात्र, त्या संस्थेकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने त्या संस्थेला अपात्र ठरवून वेंगुर्ला तालुक्यातील संस्था निश्चित करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.
रिक्त असलेल्या मदतनीस आणि मिनी सेविका यांची ५० टक्के पदे भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. मात्र, या ५० टक्क्यांमध्ये प्राधान्याने कोणती पदे भरावीत याबाबत मार्गदर्शन नसल्याने ही पदे भरलेली नाहीत. आयुक्तांकडून यावर मार्गदर्शन मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी इमारत भाड्यात वाढ करण्यात आली असल्याची माहिती या सभेत सचिव पाटील यांनी दिली. आठ तालुक्यांतील प्रत्येकी ६० लाभार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र, कराटे प्रशिक्षण देणाºया संस्था निश्चित न झाल्याने अद्याप मुलांना हे प्रशिक्षण मिळत नाही.
याबाबत सभेत चर्चा करताना आता परीक्षांचा कालावधी सुरू होणार आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण लवकरात लवकर द्या किंवा परीक्षा संपल्यावर प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना सदस्या संपदा देसाई यांनी केली. घरघंटीचे १३९, विशेष घटक योजना घरघंटी पुरविणे १३, शिलाई मशीन १६०, सायकल ९४ तर एमएससीआयटीच्या २२८ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.रिक्त पदांमध्ये अंगणवाडी सेविका ५१, मदतनीस ७४ तर मिनी अंगणवाडी सेविका १७ पदे रिक्त आहेत. १५९६ अंगणवाड्यांपैकी ४७९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याची माहिती सभेत देण्यात आली.