सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. प्रशासनातर्फे मतदानासाठी ८३८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी मुख्य निवडणूक निरीक्षकांना निश्चित केले असून, ते जिल्ह्यात दाखलही झाले आहेत. निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येकी आठ स्थायी व आठ फिरत्या सर्वेक्षण पथकांची स्थापना केली असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून, प्रशासनाकडूनही या निवडणुकीची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. या निवडणुकीत ५,६३,६३१ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी तिन्ही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन मुख्य निवडणूक निरीक्षक निश्चित करण्यात आले आहेत. यात कुडाळ व मालवण विधानसभा मतदारसंघांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गसाठी रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गोटे, तर कणकवली, देवगड, वैभववाडीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)रविवारी नामनिर्देशनपत्र स्वीकारणार१ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे आॅनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. रविवारी कार्यालयीन सुटी असली तरी या दिवशीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, असे खाडे यांनी सांगितले.आठ फिरती पथकेनिवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या प्रवेश मार्गावर आठ स्थायी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात निवडणुकीसाठी पैसे, दारू त्याचप्रमाणे मतदारांवर प्रभाव टाकू शकणारी साधने, आदींचा शोध घेण्यात येणार आहे तर जिल्ह्यांतर्गत निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच आचारसंहिता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आठ फिरत्या सर्वेक्षण पथकांची नेमणूक केली आहे. विशेष मदत कक्षजिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयांमध्ये विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे. आवश्यकता भासल्यास उमेदवार या कक्षाची मदत घेऊ शकतात. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावरही एका मदत कक्षाची स्थापना केली असून प्रथमेश कसालकर यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
सोळा पथकांचा गुप्त हालचालींवर वॉच
By admin | Published: January 30, 2017 11:30 PM