कणकवली : भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोत वाढवून ते टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठीच जानवली नदीपात्रातील गाळ काढण्यात येत आहे. जलसंवर्धनात जनतेचा सहभाग लाभल्यास ती एक लोकचळवळ बनेल. त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी येथे केले.कणकवली तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून जानवली नदी पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती साना येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, कृषी विभागाचे राठोड, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नायब तहसीलदार आर. जे. पवार, बांधकाम सभापती रुपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, प्रा. दिवाकर मुरकर, जेष्ठ नागरिक भाई खोत, अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, उमेश वाळके, राजू बागवान, रोटरी क्लबचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे सुहास हर्णे, मकरंद घळसासी, संजय घाडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, जानवली नदी पुनरुज्जीवनासाठी शासनाकडे ३७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून जानवली नदीकिनाऱ्यावरील १५ हून अधिक गावांमध्ये जलस्रोत वाढणार आहेत. कुडाळ, देवगड आदी परिसरात गाळ काढण्याच्या कामाला लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. याबाबत आणखी लोकजागृती होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समीर घारे : जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावीजानवली नदीतील गणपती साना येथे गाळ काढण्याचा प्रारंभ करण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत हा गाळ काढण्यात येणार आहे. २००० हून अधिक डंपर गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्यातील गाळ शेतकऱ्यांना सुपीक जमिनीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न घेता देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक व इतरांना भरावासाठी नदीपात्रातील गाळ देण्यात येणार आहे. गाळ उपसण्याच्या या कामात लोकहित लक्षात घेऊन नागरिकांनी सहभागी व्हावे, आणि जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले.जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेप्रांताधिकारी संतोष भिसे यांनीही या लोकचळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. लोकजागृती झाली तर बऱ्याच अंशी हे उद्दिष्ट साध्य होईल. कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गणपती सान्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
जलसंवर्धन लोक चळवळ व्हावी
By admin | Published: May 13, 2016 11:38 PM