डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले‘लोकमत’चा दणका : दोन दिवसात जास्त पाणी सोडणारबांदा : गेले कित्येक दिवस बांदा शाखा कालव्यातून पाणी सोडण्यास चालढकल करत असलेल्या कालवा विभागाने ‘लोकमत’च्या वृत्ताने जागे होत आज पाणी डोंगरपाल येथून सोडले. दुपारपर्यंत हे पाणी बांदा-बळवंतनगर येथे पोहोचले आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे कालवा विभागाने स्पष्ट केले. बांदा शाखा कालव्याची यावर्षी साफसफाई करण्यात न आल्याने कालव्यातील पाणी हे अस्वच्छ झाले आहे.यावर्षी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मार्च महिन्यातच कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पाठपुुरावा केला होता. यासाठी थेट राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालण्यात आले होते. त्यांनी तिलारीच्या मुख्य अभियंत्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणी सोडण्याचे संकेत देण्यात आले होते.मात्र, कालवा विभागाने अचानक महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गाळेल येथे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पाणी सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तोंडावर कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने २९ एप्रिलच्या अंकात ‘शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच’ या मथळ्याखाली कालव्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामध्ये कालव्याची सध्याची स्थिती व पाणी न सोडण्यामागची कारणे सविस्तर मांडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत कालवा विभागाने आज सकाळीच डोंगरपाल येथील गेटमधून कालव्यात पाणी सोडले.गाळेल येथून हा कालवा डिंगणे, सटमटवाडी, बांदा येथून ओटवणेपर्यंत जातो. मात्र, गेली कित्येक वर्षे कालव्याची साफसफाई करण्यात आली नाही. कालव्यातून पाणी सोडण्याचे हे दुसरे वर्ष असल्याने कालवा विभागाने कालव्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. कालव्यात जंगली झाडांची वाढ झाल्याने कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी कचऱ्यामुळे अस्वच्छ झाले आहे. कालव्यातून सोडलेले पाणी हे बांदा-बळवंतनगर येथेपर्यंत पोहोचले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी ओटवणेपर्यंत जाणार आहे. (प्रतिनिधी)
डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले
By admin | Published: May 01, 2016 12:26 AM