बागायत : मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा भागातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी याबाबत मसुरे-डांगमोडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. खोतजुवा येथील पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला ग्रामसेवक एस. डी. चव्हाण, मसुरे उपसरपंच अशोक बागवे, ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत, शिवसेना उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, पंढरी मसुरकर, अॅड. पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर आदी उपस्थित होते.मसुरे खोतजुवा हा भाग म्हणजे एक बेट असून चारही बाजूने खाडीचे पाणी आहे. हे पाणी खारे असल्याने पिण्यासाठी येथील ग्रामस्थांना पाणी नाही. ग्रामपंचायतीने खाजणवाडी ते खोतजुवा अशी नळपाणी योजना सुरू केली. मात्र, या नळपाणी योजनेचे पाणी पुरेसे नाही, असा ग्रामस्थांचा दावा आहे. यासाठी ग्रामस्थांनी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य पूर्वा ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गजानन ठाकूर यांच्यासमवेत ग्रामपंचायतमध्ये जावून आपले म्हणणे मांडले. त्यानुसार या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत ग्रामस्थांच्यावतीने गजानन ठाकूर यांनी बाजू मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी खोतजुवा विभागासाठी लोकसंख्या कमी असतानाही आपण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ३१ लाख ६४ हजार ४00 रूपये किंमतीची विहीर व नळपाणी योजनेचे काम सुरू केले आहे, असा खुलासा केला. ग्रामस्थांनी यावेळी या बैठकीला मसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री ठाकूर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच अशोक बागवे यांच्याकडे असल्याचे ग्रामसेवक व प्रभूगावकर यांनी स्पष्ट केले. त्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जर सरपंचांना कामकाज हाताळता येत नसेल किंवा त्यांना प्रश्न सोडवायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. मात्र, यात संग्राम प्रभूगावकर यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविला.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मसुरे खाजणवाडी येथे खोदण्यात आलेल्या विहिरीचे पाणी दूषित असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रभूगावकर यांनी ते मान्य केले. याठिकाणी नवीन विहीर बांधण्यासाठी जागा देण्याचे साकडे किसन चांदेरकर यांनी प्रभूगावकर यांना घातले. त्याला प्रभूगावकर यांनी दुजोरा दिला. तसेच जमीन देण्याचे मान्य केले. मात्र, त्याठिकाणी पाणी दूषित पाणी मिळाल्यास चांदेकर जबाबदार राहतील असे सांगितले.सध्या नवीन विहिरीला वेळ लागणार असल्याने ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या चालू असलेली नळपाणी योजनेची दुरूस्ती करून,विहिरीचा थोडा उपसा करावा व तसे केल्यास पाणीपुरवठा होईल, असे सांगितले. याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्यांनीघ्यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी खोतजुवा भागातील सुमारे ५0 ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
खोतजुवा भागात पाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: May 22, 2015 9:42 PM