देवगड : देवगडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपोषणाला बसणार आहे. सरकारला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडण्यात येईल. येत्या ६ नोव्हेंबरला देवगड येथे जलआंदोलन करून रास्ता रोकोही करण्यात येणार असल्याची माहिती देवगड येथे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेला दिली. जलआंदोलनाची आढावा बैठक देवगड शासकीय विश्राम गृहामध्ये राणे यांनी कार्यकर्त्यांसेबत घेतली. यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश राणे, सभापती डॉ. मनोज सारंग, वित्त बांधकाम सभापती संजय बोंबडी, उपसभापती स्मिता राणे, आरीफ बगदादी, रविंद्र जोगल, अनिल पुरळकर, बाळा खडपे, उल्हास मणचेकर, तन्वी चांदोस्कर, पंचायत समिती सदस्य प्रणाली माने, योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होते. नीतेश राणे म्हणाले की, देवगडचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ६ नोव्हेबर रोजी जलआंदोलन करून देवगडमध्ये रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासाठी विभागामार्फत तालुक्यातील जनजागृती करून लोकांना सहभागी होण्यासाठीही सांगण्यात येणार आहे. येथील पाणीटंचाईची तीव्रता काय आहे, कशाप्रकारे येथील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. याबाबत राज्यशासन दखल घेईपर्यंत संघर्षच करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवगड येथील परप्रांतीय नौकांनी देवगड समुद्रामध्ये घुसखोरी करून येथील स्थानिक मच्छिमारांच्या जाळयांचे लाखो रूपयांची नुकसानी केली आहे. यासाठीही आमदार या नात्याने येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून नुकसानग्रस्त मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार आहे. तसेच घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पध्दतीने या नौकांवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. मच्छिमारांचा प्रश्न कायस्वरूपी सुटावा त्यांना संरक्षण देण्यात यावे यासाठीही मी अधिवेशनामध्ये आवाज उठवून मच्छिमारांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री फक्त खोटी आश्वासने देत आहेत. मात्र येथील जनतेच्या प्रश्नांशी त्यांना कोणत्याही प्रकारचे देणे नसल्यासारखेच ते काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. झोपेतून उठलेल्या व्यक्तीसारखे व पावसाळयातील बेडकासारखी आपल्यावर टीका करू नये. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर देवगड नगरपंचायतीची अधिसूचना ६ नोव्हेंबर अगोदर जाहीर करा आणि नंतरच टीका करा असे देवगड भाजपा पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता उपरोधिक टीका आमदार राणे यांनी केली. माजी आमदारानी देवगड नगरपंचायत रखडवल्याच्या आपल्या आरोपावर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तेच देवगड नगर पंचायत न होण्यास कारणीभुत असल्याचे स्पष्ट झाल्याचे आमदार नीतेश राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
पाणीप्रश्नासाठी ६ नोव्हेंबरला जलआंदोलन
By admin | Published: October 19, 2015 10:49 PM