अडरे : यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने चालू वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. चिपळूण तालुक्यात यावर्षी ५७ गावे व १३९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. दरवर्षी मार्च ते मे या दरम्यान ग्रामीण भागाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी या भागातील ग्रामस्थांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने चिपळूण पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये पाणीटंचाईची झळ बसणारी ५७ गावे व १३९ वाड्यांसाठीच्या उपाययोजनेसाठी एकूण ५९.५० लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यावर्षीच्या आराखड्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा वाड्यांची संख्या जास्त आहे. या आराखड्यात टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी चिपळूण तालुक्यात १२ गावे व ४३ वाड्यांना ३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी खडपोली, दहिवली, कामथे बुद्रुक, कामथे खुर्द, निरबाडे, गाणे, कोंडमळा, कापसाळ, अडरे, रिक्टोली, कोसबी, वेहेळे, खेरशेत, सावर्डे, गुढे, नारदखेरकी, स्वयंदेव, राधानगर, पोफळी, शिरगाव, कापरे, भोम, केतकी, परशुराम, रामपूर, टेरव, पोसरे, तिवडी, आकले, वालोटी, कोळकेवाडी, गोंधळे, रावळगाव, आबिटगाव, तळवडे, कळंबट, ओमळी, कुंभार्ली, वडेरु, पिंपळी बुद्रुक, तिवरे, कळकवणे, नांदगाव, कुटरे, येगाव, दुर्गेवाडी, कोकरे, खांदाट, दळवटणे, ताम्हणमळा, बिवली, गांग्रई व कुडप या गावांच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईची झळ लवकर बसणार आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात झाली असून, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, चिपळूण तालुक्यात या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाल्याने पाणीटंचाई तीव्र होणार आहे. (वार्ताहर)यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम.पाण्यासाठी ग्रामस्थांची मैलोन्मैल पायपीट.चिपळूण पंचायत समितीकडून आराखडा तयार.बंधारे मोहिमेला कमी प्रतिसाद.
चिपळूण तालुक्यात पाणीटंचाईची झळ
By admin | Published: February 08, 2016 10:16 PM