मालवण : पावसाळा सुरु होण्यास अद्याप दीड-दोन महिने असताना एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच मालवण तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक कळशी पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. असे असतानाही मालवण तालुक्याच्या प्रशासनाने मात्र जिल्हा प्रशासनाला टँकरची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. येथील संभाव्य पाणीटंचाईबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ७२ लाख रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.मालवण तालुक्याला सध्या पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. पाणीटंचाईच्या निवारणार्थ मालवण पंचायत समितीतर्फे सभापती सीमा परुळेकर, उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी संभाव्य पाणीटंचाई आराखड्यासाठी खास सभाही शुक्रवारी आयोजित केली होती.मालवण तालुक्यात जी पाणीटंचाई आहे त्या पाणीटंचाईचा आराखडा पंचायत समितीच्यावतीने जिल्हा प्रशासनास सादर केला. या आराखड्यात तालुक्यातील नळयोजना विशेष दुरुस्तीत वराड बौद्धवाडी, चौके कुळकरवाडी, असगणी तांबेवाडी, काळसे परबवाडी, श्रावण बाजारपेठ, मठबुद्रुक पाणलोसवाडी व लिंग्रजवाडी, वरची गुरामवाडी, वाईरकरवाडी, कांदळगाव मुळयेवाडी यांचा समावेश असून यासाठी सुमारे १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातून ९ वाड्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. इंधन विहीर दुरुस्तीसाठी चाफेखोल आवाटवाडी आणि वायंगवडे धनगरवाडी यांचा समावेश आहे. यासाठी २० हजार रुपये अपेक्षित आहेत. नवीन विंधन विहिरीसाठी असरोंडी दाडसखलवाडी, आंबडोस देवळामागील धनगरवाडी, आंबेरी डिचोलकरवाडी, आडवली, मालडी, आनंदव्हाळ सुकाळीवाडी व पलिकडची कदमवाडी, कांदळगांव शेमाडवाडी व पाताडेवाडी, कातवड धनगरवाडी व घाडीवाडी, काळसे धनगरवाडी, किर्लोस धनगरवाडी व गावठाणवाडी टेंब, कुंभारमाठ धनगरवाडी, कुडोपी बौद्धवाडी, कोळंब न्हिवे- आडारी टेंबवाडी, खोटले बौद्धवाडी, गोठणे सडेवाडी, चाफेखोल माळवाडी, चौके मांडखोलवाडी व थळकरवाडी, तारकर्ली खालचीवाडी, तिरवडे उगवतीवाडी, नांदरुख घरटणवाडी व पलिकडचीवाडी, नांदोस चव्हाणवाडी, पळसंब गावठाणसडा, राठीवडे सडेवाडी, मधलीवाडी, जांबडश्वरी, रेवंडी खालची-मधली-तांडेलवाडी, कांबळीवाडी, मधलीवाडी, वरची गुरामवाडी, कुंभारवाडी व कट्टा तेलीवाडी, वराड कुसरवेवाडी, पालववाडी यासह ६३ वाड्यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ४७ लाख २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना घेण्यासाठी काळसे-नमसवाडी, मसुरे देऊळवाडी, चौके वावळ्याचे भरड, महान महापुरुषवाडी, काळसे वरचावाडा, कांदळगांव देऊळवाडा, काजराटवाडी, पाताडेवाडी यांचा समावेश आहे. या आठ वाड्यांसाठी १० लाख ५० हजारांचा निधी आवश्यक आहे. विहिरी खोल करणे आणि गाळ काढणे यामध्ये हेदूळ खालची सावंत व कानडेवाडी, वराड देऊळवाडा व सावरवाड, काळसे बागवाडी, वायरी भूतनाथ किल्ला, चिंंदर सडेवाडी, बुधवळे बौद्धवाडी, पळसंब गावठण या ९ वाड्यांसाठी ९० हजार रुपयांची आवश्यकता आहे.मालवण तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर भासत असताना तालुका प्रशासनाने मात्र पाणीटंचाईच्या निवारणार्थ टँकरची गरज नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन किती निधी देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
मालवणात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
By admin | Published: April 10, 2015 9:36 PM