कुडाळ : कुडाळच्या नदीतून एमआयडीसी चिपी विमानतळासाठी पाणी देणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कुडाळच्या लोकशाही दिनात दिली आहे. पाण्याच्या साठ्याकरिता भंगसाळ नदीवर पक्का बंधारा नव्याने बांधण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कुडाळ तालुक्याचा लोकशाही दिन कुडाळ तहसीलदार कार्यालयात तहसीलदार जयराज देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकशाही दिनात एकही अर्ज आला नसल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुडाळमधून एमआयडीसी चिपी विमानतळासाठी पाणी नेणार आहे का, असा प्रश्न विचारला असता, एमआयडीसीचे अधिकारी यांनी सांगितले की, चिपी विमानतळासाठी कुडाळ येथूनच पाणी नेणे सोयीस्कर ठरणार असून सध्या ही प्रक्रिया मंजूर होण्याकरिता शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू आहेत. मंजुरी मिळाल्यावर भंगसाळ नदीवर पक्का बंधारा नव्याने बांधण्यात येणार असून, पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत योग्य भूमिका घेतली जाणार असून संबंधित बांधकाम विभागाला तशा सूचना दिल्या असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. भंगसाळ नदीतील काढलेल्या गाळासंदर्भात चौकशीचे आदेश आले असून, संबंधित गाळ साफसफाईच्या नियमाने काढण्यात आला असल्याने त्याला रॉयल्टी नसल्याने शक्य तो कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती देशमुख यांनी दिली. तरीही याबाबत योग्य ती चौकशी सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) आरोपींना अटक करणारच : निकममहसूल विभागाच्या ताब्यात असलेले डंपर चोरून नेणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात असून, या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलीस उननिरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.
चिपी विमानतळासाठी एमआयडीसीतून पाणी देणार
By admin | Published: January 19, 2015 11:27 PM