नीलेश जाधव -मार्लेश्वर --पूर्वीच्या काळी देवाच्या नावाने जंगल राखून ठेवले जात असे. त्यास देवराई किंवा देवरहाटी असे म्हटले जाते. कोकणातील प्रत्येक गावा-गावात दिसणारी देवराई सद्यस्थितीला दिसेनाशी झाली आहे. आधुनिकीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली देवराईतील अनेक झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कोकणातील देवराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.कोकणातील ग्रामीण भागामध्ये प्राचीन काळापासून असलेली देवराई आजही काही प्रमाणात बघायला मिळते. देवराईमध्ये अगदी प्राचीन व दुर्मिळ वृक्ष असतात. तसेच सुंदर विहिरी, तलाव व कुंडही आढळतात. पूर्वीच्या काळातील देवांच्या मूर्ती व लिंग इत्यादींच्या माध्यमातून देवतांचे अस्तित्त्वही पाहायला मिळते. त्यामुळे वृक्ष, झुडपे, किटक, पक्षी, प्राणी व जलस्रोतांना अभय मिळत असे.सद्यस्थितीला आधुनिकीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली देवराईची कत्तल करण्यात येत आहे. धरणे, पर्यटन व आधुनिकीकरण यासाठी देवराया तुटत चालल्या आहेत. इतकेच नव्हे तर मंदिरांच्या सुशोभिकरणासाठीही काही ठिकाणी देवराईची कत्तल होताना दिसून येत आहे. त्यामुळे देवराईची असणारी परंपरा, दुर्मिळ झाडे, प्राणी, पक्षी व त्यांचे आजच्या काळातील महत्त्व याविषयी प्रबोधन करणे महत्त्वाचे आहे. तसेच देवराई वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. पर्यावरणप्रेमींनीसुद्धा या समस्येकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. देवराईची होणारी कत्तल कुठेतरी थांबली तरच निसर्गाचा देवराईच्या रुपातील ठेवा अबाधित राहू शकतो, नाहीतर देवराईची कत्तल अशीच सुुरु राहिल्यास पूर्वजांपासून तग धरुन असणारी ही देवराई पूर्णपणे नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे.देवराईचे धार्मिक महत्त्वदेवराईमध्ये गावातील विविध धार्मिक कार्यक्रम, जत्रा, ग्रामसभा, गावकीचे तंटे आदींचे निर्णय होतात. तसेच नवरात्र व होळी या दोन्ही सणांचा निकटचा संबंधही देवराईशी असतो. गावकी व मानकऱ्यांच्या निर्णयावरुन देवळासाठी देवाचा कौल लाऊन देवराईचा व गावरहाटीचा उपयोगही आज केला जातो. शिमग्यातील शिंपणे, पालखी, सहाण या बाबींशीही देवराईचा निकटचा संबंध असतो. आजही देवराईतील असणाऱ्या झाडांची पडलेली पाने म्हणजेच पातेरी व सुकलेली लाकडे यांचा निर्णयदेखील गावकीवर अवलंबून असतो, असे देवराईच महत्त्व आहे.हिरडा, बेहडा, गुळवेल, सर्पगंधा, तुळस, अर्जुन, कळलावी अशा औषधी देवराईत पाहायला मिळतात. अशा औषधी वनस्पतींचे संवर्धनही देवराईतून होत असे. पक्षी व प्राणी संवर्धनात व संरक्षणातसुद्धा व देवराईचे महत्त्व आहे. हळद्या, ससा, उदमांजर, मसण्याअद, काळगा, घुबड, खंड्या, नीळकंठ, मक्षिका भक्षक असे प्राणी व पक्षीही देवराईत आढळतात. भेला, अशोक, वड, माड, दासवण, अर्जुन, उंबर, सीता आदी दुर्मिळ प्राचीन झाडेही देवराईमध्ये असतात.
कोकणातील ‘देवराई’ नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Published: April 08, 2015 9:48 PM