सिंधुदुर्ग : दर तीन वर्षांनी होणारी मालवण तालुक्यातील वायंगणी गावची देवपळण अर्थात गावपळण ११ मार्च पासून सुरू होत असून ग्रामदेवतेसहित ग्रामस्थ तीन दिवस तीन रात्री वेशी बाहेर रानावनात झोपड्या उभारुन राहणार आहेत.
या देवपळणीचे वैशिष्ट्य म्हणजे देवपळणी बरोबरच गावपळणही होते. पहाटे गुप्त पणे देव वेशिबाहेर गेल्यावर इशारा झाल्यानंतर वायंगणी गावच्या गावपळणीस सुरुवात होते.वायंगणी गावचे देव वार्षिक डाळपस्वारीनंतर रवळनाथ मंदिरात आल्यावर देवपळणीचे वर्ष आल्यावर बारापाच मानकरी यांना तीन साली मर्यादेची सूचना ग्रामदेवतेने दिल्यानंतर रवळनाथ देवाला कौल प्रसाद घेऊन बारा पाच मानकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत देवपळणीचा वार तिथी निश्चित केली गेली.
या प्रमाणे सोमवारी ११ मार्च रोजी वायंगणी गावची देवपळण होत असून या साठी वेशी बाहेर पूवार्पार ठिकाणी जागा साफसफाई, झोपड्या उभारण्याच्या तयारीला वायंगणी ग्रामस्थ गुंतले आहेत. तीन दिवस तीन रात्री नंतर वेशीबाहेर देवाला कोल प्रसाद घेऊन पुन्हा गाव भरणार आहे