खूप वर्षांपूर्वी हिंदीच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा होता शेख चिल्ली नावाचा. ज्या फांदीवर बसला होता, तीच फांदी तोडणारा. ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येणार आहेत, असा पुस्तकातला धडा एवढंच तेव्हा त्या धड्याचं महत्त्व वाटत होतं. परीक्षा संपली की धड्याचं महत्त्व संपलं. पण नंतर जगण्याच्या वाटेवर प्रत्येक ठिकाणी असंख्य शेख चिल्ली भेटत गेले आणि लक्षात आलं की तो धडा तिथंच संपलेला नाही. (कदाचित म्हणूनच त्याला ‘धडा’ म्हणत असावेत.) आजही स्वत:च्या त्रासाला, स्वत:च्या विनाशाला स्वत:च कारणीभूत होणारे अनेक शेख चिल्ली आसपास वारंवार दिसतात. किंबहुना प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात शेख चिल्लीच आहे. फक्त प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय. आपणही शेख चिल्ली आहोत, हे कोणीच मान्य करत नाहीये. आपण सगळेच शेख चिल्ली आहोत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गावोगावी कोसळणाऱ्या दरडी.शेकडो वर्षांपूर्वीचे डोंगर ‘उभं राहायचा कंटाळा आला’ म्हणून हे असे अचानक कोसळू लागले आहेत का? कुठल्या ना कुठल्या गावात हे गेली कित्येक वर्षे सुरूच आहे आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वांनी मिळून केलेली पर्यावरणाची नासाडी. निसर्ग जे घेतो, त्याची परतफेड करतो. आपण त्याला चांगलं दिलं तर तो चांगल्याच स्वरूपात त्याची परतफेड करतो. पण आपण जर त्याचं नुकसान केलं तर तोही आपलं नुकसान करतो. हा अनुभव सगळ्याच ठिकाणी येतो. समुद्रात टाकलेला कचरा समुद्र आपल्या पोटात कधीच ठेवत नाही. तो किनाऱ्यावरच आणून टाकतो. एखाद्या मातीत रोपटं लावलं तर त्याचं झाड होतं. पण एखादं झाड तोडलं तर... अनेक अंगांनी आपले नुकसान होते.गेल्या अनेक वर्षात विकासाच्या नावाखाली आपण मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आहे. वाढत्या मनुष्यवस्तीच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून, फर्निचर तयार करण्यासाठी, शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी... अशा एक ना दोन, असंख्य कारणांसाठी प्रचंड जंगलतोड झाली आहे. पर्यावरणवाद्यांनी केलेल्या उठावानंतर सरकारने वृक्षतोडीसाठी कायदे केले. कायदे अतिशय छान आहेत. पण त्याचं पालन होतंय का? त्यातून पळवाटा काढून जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. जंगलतोडीमुळे एकतर वन्यजीव मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत आणि दुसरीकडे निसर्गाचा असमतोल होऊ लागला आहे. यावर आता गांभीर्याने विचार करायलाच हवाय.विकासाच्या नावाखाली अनेकदा अनेक गोष्टी केल्या जातात. पण त्यातून होणाऱ्या नुकसानाचा विचार केला जात नाही. डोंगर आणि दऱ्यांचा मार्ग असलेल्या कोकणात रेल्वे धावणार, ही कधी काळी वेड्यात काढली जाणारी गोष्ट होती. पण काही लोकांचा पाठपुरावा, काही लोकांची कल्पकता आणि असंख्य लोकांचे श्रम यामुळे हे वेडगळ वाटणारं स्वप्नं खरं झालं. रेल्वे कोकणात आली, ही गोष्ट अतिशय सकारात्मक. पण रेल्वेचे काम करताना निसर्गाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला. मार्ग तयार करण्यासाठी जे डोंगर भेदण्यात आले, ती माती आसपासच टाकण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह बदलून गेले. राजापुरात पूर येण्याचे प्रमाण कमी झाले, त्याला कोकण रेल्वेच्या कामामुळे बदललेले पाण्याचे प्रवाह हे एक प्रमुख कारण आहे. पण ही एक गोष्ट वगळली तर पाण्याचे प्रवाह बदलण्याचा अनेक ठिकाणी त्रासच झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवसरला निर्माण झालेली समस्या ही भूगर्भातील पाण्यामुळेच झाली आहे. २000 ते २00५ या पाच वर्षात कोकण रेल्वेला डोंगरांच्या पडझडीचा मोठा त्रास झाला. त्यावर खूप मोठा खर्च करावा लागला. हे धोके लक्षात घेता कोकण रेल्वे आणायला नको होती, असा मुद्दा मांडायचा नाही. निसर्गाच्या रचनेला धक्का लावताना खूप विचार करायला हवा, हेच यातून मांडायचे आहे.कोणत्याही प्रकल्पाची खोदकामे, त्यासाठी लावले जाणारे सुरूंग, त्यासाठी यंत्रांनी होणारी कामे यामुळे आसपासच्या भूभागावर ताण पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच डोंगर पडझडीच्या घटना वाढल्या आहेत. विकास करताना निसर्गाच्या रचनेचे भान ठेवायला हवे. नवीन प्रकल्प आणताना निसर्गाची रचना हलणार नाही ना? ती विस्कळीत होणार नाही ना, याचा विचार करायला हवा. जर ती होणार असेल तर त्यावरील उपायही लगेचच शोधायला हवेत.कोकणात एकूणच डोंगर खचण्याच्या आणि जमिनीला तडे जाण्याचे प्रकार गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचा एकत्रित अभ्यास व्हायला हवा. पाखाड्या आणि वर्गखोल्यांमध्ये राजकीय लोकांकडून त्याची अपेक्षाच करायला नको. स्वयंसेवी संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जर या पडझडीचे कारण कळले तरच त्यावरील उपाय योजणे शक्य आहे. अन्यथा दरवर्षी डोंगर खचत राहतील आणि निष्पाप लोकांचे बळी जातील.डोंगर खचण्याचे इतके प्रकार होत असतानाही रत्नागिरी जिल्ह्याला भूवैज्ञानिक कार्यालय असले तरी गेली अनेक वर्षे वरिष्ठ भूवैज्ञानिक हे नियमित पद नाही. त्याचा कार्यभार बराच काळ कोल्हापूरच्या अधिकाऱ्याकडेच होता. पण रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही आमदाराला त्याकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही. किमान दाभोळच्या दुर्घटनेनंतर तरी त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा! नाहीतर आपण फांदी तोडायला सुरूवात केलीच आहे. खाली आपटायला वेळ लागणार नाही. --- मनोज मुळ््ये
आपण सगळेच शेख चिल्ली
By admin | Published: June 26, 2015 11:15 PM