कणकवली : एसीबीच्या चौकशीला आपण पुर्णपणे सहकार्य करत आहे. या चौकशी मागे कोणाचा हात होता हे आता नितेश राणेंच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या नितेश राणेंना शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील. असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला.
सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेने, शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आणि सिंधुदुर्गवासीयांचा आपण आभारी आहे. या मोर्चातून आपणास पुढील काळात लढण्याची ताकद मिळाली असल्याचेही नाईक म्हणाले.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपण १९९६ पासून व्यवसायात आहे. आपली कोणतीही बेनामी मालमत्ता नाही. एक रुपयाही आपण गैरमार्गाने मिळवलेला नाही. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना वैभव नाईक म्हणाले, सत्ता बदल झाल्यानंतर राज्यातल्या आणि केंद्रातल्या तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न नितेश राणे व नारायण राणे यांनी सुरु केला आहे. या कारवाई मागे राणे कुटूंबीय आहे. निश्चितपणे या चौकशीतून सत्य बाहेर येईल, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही ते म्हणाले.गेल्या दोन निवडणुकीत नितेश राणे व नारायण राणेंना जिल्हयातील जनतेने नाकारले आहे. ते ज्या पक्षात गेले त्या पक्षानेही त्यांना नाकारले आहे म्हणून सच्च्या कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची त्यांना कदर असणार नाही. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभेत बोलण्याच्या मर्यादा पाळा, कायदा व सुव्यवस्था राखा असे सांगत आहेत आणि दुसरीकडे एका माजी मुख्यमंत्र्यावर नीतेश राणे अशी खालच्या पातळीवर टीका करत असतील तर त्यांच्यावर सरकार काय कारवाई? असा सवाल करीत आम्ही आमच्या पध्दतीने तक्रार दाखल करू असे म्हटले आहे.माझी मालमत्ता वाढली कारण..१९९६ पासून आपण व्यवसाय करतो. माझ्या व्यवसायात नफा होतो त्याप्रमाणे संपत्तीत वाढ होत आहे. त्यावेळी आपण राजकारणातही नव्हतो. सचोटीने आपण व्यवसाय केला. माझी मालमत्ता मी आणि कुटूंबियांनी निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्रात दाखवलेली आहे. गेल्या निवडणुकीत माझी मालमत्ता वाढली कारण. माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर कुटूंबाच्या वारसहक्काने मालमत्ता माझ्या आणि भावाच्या नावावर वर्ग झाली. सर्व मालमत्ता आम्ही रितसर दाखवल्या आहेत. एक - एक रुपयाचा आणि जागेचा हिशोब आपण दाखवलेला आहे. एक रुपयाची प्रॉपर्टी जरी गैरमार्गाने मिळवली असेल तर आपण कोणत्याही कारवाईस तयार आहे.राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय?पण राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय आहे? नितेश राणेंनी स्वतःच्या हिंमतीवर कोणता व्यवसाय केला आहे, हे त्यांनी सांगावे असे आव्हानही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.