कणकवली: भाजपच्या स्थानिक आमदारांनी २२०० कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याचा फलक कणकवली शहरात लावला आहे. तो निधी नेमका कोठे गेला. हे त्यांनी जनतेला सांगावे. असे सांगतानाच कोणत्याही आमिषाला बळी न पडता आम्ही निष्ठेला जागणारे आहोत, पळपुटे आमदार नाही,असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.कणकवली येथे 'होऊ द्या..चर्चा अंतर्गत आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हासंघटक जान्हवी सावंत यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, जनतेच्या मनातील प्रश्नांची चर्चा करण्यासाठी शिवसेनेने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेवू, मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण देवू असे सांगितले होते. त्याचे काय झाले? ..तर आरोग्य व्यवस्था सुधारली असतीसरकारी नोकर भरतीमध्येही खासगीकरण आणण्यासाठी सरकारने ९ कंपन्या नेमल्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये भाजपच्या आमदारांच्या जास्त कंपन्या आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून १ कोटी रुपये मंडप घालण्यासाठी देण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी ९० लाख एसटी भाडे लागले. लोकांच्या आरोग्यासाठी हे २ कोटी वापरले असते तर आरोग्य व्यवस्था सुधारली असती. 'हे' उद्धव ठाकरे यांनी केलेले काम ओरोस जिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषधे नाहीत. कोरोना काळात याच जिल्हा रुग्णालयात असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने १२ हजार लोक बरे होवून गेले आहेत. त्यावेळी असलेली आरोग्य यंत्रणा चांगल्याप्रकारे हाताळली होती. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले काम आहे.आता जनतेने विचार करावातलाठी परीक्षा भरती प्रक्रियेला पेपर फुटला ? त्यावेळीही मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली. जिल्ह्यातील ४३४ शाळा बंद होणार आहेत. आम्ही आंदोलन केले, मंत्री सांगताहेत शिक्षक भरती करतो. मात्र, अद्याप शिक्षकांची भरती झालेली नाही. स्थानिक आमदार 'हिंदू खतरे मे है' असे सांगत फिरतात. मात्र सत्तेत हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. याचा विचार आता जनतेने करावा. गुरुनाथ खोत म्हणाले, देशातील सरकार लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालले आहे. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने लोकांना देशोधडीला लावले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सरकार बदलावेच लागेल. संदेश पारकर म्हणाले, भाजपच्या विरोधात जनतेच्या मनात चीड आहे. भाजपाने विविध घोषणा केल्या मात्र, पूर्ण केल्या नाही. तरुणांना रोजगार नाही. शिवस्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण नाही. महागाईचा आगडोंब उसळला आहे. हे केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश आहे. जिल्ह्यात ३० वर्षे राणेंची सत्ता आहे.त्यांनी जनतेसाठी काय केले? हे विचारावे लागेल. त्यामुळे या विधानसभा मतदासंघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागूया. यावेळी उपस्थित इतर मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले.
आम्ही निष्ठेला जागणारे, पळपुटे आमदार नव्हे - वैभव नाईक
By सुधीर राणे | Published: October 07, 2023 1:26 PM