कुडाळ : कुडाळ शहराचे चित्र बदलण्याची ताकद फक्त शिवसेनेतच असल्याने कुडाळचे मतदार नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात देवून चमत्कार घडवतील असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मी युतीबाबत आग्रही असून युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेना म्हणून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असेही ते म्हणाले. कुडाळ शिवसेना शाखा येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, कुडाळ शहराचे चित्र बदलायचे आहे व हे चित्र बदलण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे. कुडाळ शहरासाठी मी साडेतीन कोटीचा भरीव निधी मंजूर केला. मात्र आचारसंहितेमुळे तो खर्ची घालू शकत नाही. नवीन नगरपंचायतीसाठीही सरकारने भरीव निधी दिला आहे, असे त्यांनी सांगितले. मला कोणाला उत्तरे देण्याची गरज वाटत नाही. मी या जिल्ह्याच्या विकास कामासाठी भरीव निधी आणतो. आता सिंधुदुर्गात जिल्हा परिषद कोणाची आहे हे न पाहता जिल्हा परिषदेसाठी १९ कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे. जिल्ह्यात ५१२ कोटींची कामे आली असून या अर्थसंकल्पात आतापर्यंत २३६ कोटीचा निधी जिल्ह्याला दिल्याचेही केसरकर म्हणाले. कुडाळ शहराचा विकास करायचा हे माजी खासदार एकनाथ ठाकूर यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुडाळ एम.आय.डी.सी बंधारा पूर्ण करून २४ तास पाणी कुडाळ शहराला देण्यात येईल. निवडणूक ही शांतपणे होणारी प्रक्रिया असावी. सर्वसामान्य कार्यकर्ता मंत्री झाल्यावर काय करू शकतो हे दाखविणार आहोत. कुडाळ शहराच्या विकासासाठी मतदारांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी) मी कृतीतून उत्तर देणार : विरोधकांना टोला ४माझ्यावर टीका करणाऱ्यांवर मी कधीही टीका करणार नाही मी त्यांना माझ्या कृतीतून उत्तर देणार आहे. केवळ राजकारण न करता राजकारणाच्या पलीकडे जावून विकास काय ते समजले पाहिजे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. ४राज्यात व केंद्रात आमचे युती सरकार असून कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना, भाजपाची युती व्हावी अशी मनापासूनची इच्छा होती मात्र युती झाली नाहीतर शिवसेनेला घेवून पुढे जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
युतीसाठी आम्ही आग्रही
By admin | Published: April 05, 2016 12:42 AM