सुधीर राणे कणकवली : कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार आणि तिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न प्रसिद्धी माध्यमातून जनसामान्यांसमोर आले. त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे . "आम्ही कणकवलीकर " परिवारातर्फे एक लॅपटॉप श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिला तिच्या जिद्दीचे बक्षीस म्हणून सुपूर्द करण्यात आला आहे .सतत हसतमुख असणाऱ्या व आपल्या घरच्या तसेच परिसराच्या परिस्थितीची जाण असणाऱ्या स्वप्नालीला हे बक्षीस दिल्यानंतर ती भावुक झाली . यावेळी तिच्यामधील प्रगल्भताही जाणवून आली . यावेळी ती म्हणाली , " माझ्या पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाची ३ वर्षे पूर्ण झाली असून अजून दिड वर्षांचा कालावधी आणि त्यानंतर एक वर्षाचा अनुभव प्रशिक्षणाचा कालावधी शिल्लक आहे.समाजातील वेगवेगळ्या संस्था , व्यक्ती आणि माझे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून भरघोस आर्थिक पाठबळ मिळाले आहे . सध्यातरी माझ्याकरिता ते पुरेसे आहे . यासर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत . परंतु अशी सामाजिक जाणीव ठेवणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना कळकळीची विनंती आहे कि त्यांनी माझ्याप्रमाणे अशी धडपड करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सहकार्याचा हात द्यावा ."सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या स्वप्नालीने आतापर्यंत आपणाला ज्ञानदान करणाऱ्या सर्वच गुरुजनांप्रती आदर व्यक्त करून वेगळ्या पद्धतीने गुरुदक्षिणा दिल्याचे जाणवले . या सर्व घटनाक्रमामुळे माझी सामाजिक जबाबदारी अधीकच वाढली असल्याचे यावेळी तिने आवर्जून नमूद केले . प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी स्वप्नालीने पशुवैद्यक शास्त्र शिकण्याचा निश्चय केला आहे . त्यासाठी तिचे प्रामाणिक आणि अथक कष्ट सुरु आहेत. तिच्या या अथक जिद्दीची दखल एका कुत्र्याने देखील घेतली , असे म्हणावे लागेल . हा कुत्रा तिचा राखणदार बनून दिवसभर तिच्याबरोबर रानात असतो . कुणा अपरिचित व्यक्तीला किंवा इतर वन्य प्राण्यांना तिच्याजवळ फिरकू देत नाही .
स्वप्नालीला मदतीसाठी टेक्नोसॅव्ही जग सुद्धा पुढे सरसावले आहे . जिओ नेटवर्कची टीम तसेच सरकारी बीएसएनएल टीम सुद्धा दुर्गम भागात स्वप्नालीला तिच्या घरात अखंडित सेवा देण्यासाठीच्या प्रयत्नात आहे . याचा अर्थ "दिल्ली" ने सुद्धा स्वप्नालीची दखल घेतली आहे .
स्वप्नालीच्या ज्ञान संपादन करण्याचा अथक प्रयत्न हा दुर्गम भाग जगाच्या नकाशावर पोहोचवणार आहे . "आम्ही कणकवलीकर " यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर , डॉ. सुहास पावसकर , बाळू मेस्त्री , विजय गावकर , हनीफ पिरखान , डी. बी. तानवडे , संजय मालंडकर आणि ऋषिकेश कोरडे यांनी स्वप्नालीच्या जिद्दीला सलाम करीत लॅपटॉप तिच्याकडे सुपूर्द केला .