कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर करू : मुझफ्फर हुसेन यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:18 PM2020-08-20T17:18:29+5:302020-08-20T17:20:29+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर केले जातील. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतील व योग्य तो निर्णय घेतील.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील गैरसमज लवकरच दूर केले जातील. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतील व योग्य तो निर्णय घेतील. यासाठी लवकरच पक्षनिरीक्षक जिल्ह्यात पाठविण्यात येतील. असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे, अशी माहिती जिल्हा चिटणीस महिंद्र सावंत यांनी दिली.
प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची कणकवली रामेश्वर प्लाझा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सेलचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकाळी ९.३० वाजता भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मुझफ्फर हुसेन यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या नियुक्त्या या काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असे सांगण्यात आले.
यावेळी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेऊन मुझफ्फर हुसेन यांनी संवाद साधला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांबरोबर बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली. त्याबाबत हुसेन यांनी सकारात्मकता दाखविली.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, बाळू अंधारी, अरविंद मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष देवानंद लुडबे, सिंधुदुर्ग जिल्हा सेवा दल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्या विभावरी सुकी, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष काका कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक नीता राणे, रवींद्र म्हापसेकर, संतोष जोईल, अभय मालवणकर, संदीप सुकी, महेंद्र सावंत, भाऊ जेठे, माया चिटणीस, नूतन सावंत, पल्लवी तारी, कृष्णा आचरेकर, महेश परब, बाळ धाऊसकर, संजय राणे, महेश तेली, निखिल गोवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सर्फराज नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष सोमनाथ टोमके, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, चंद्रकांत राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे हा वाद आता मिटणार की वाढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड
सिंधुदुर्गातील काँग्रेस तालुकाध्यक्ष तसेच इतर पदांच्या निवडीवरून पक्षातील कार्यकर्त्यांमधील गटबाजी उघड झाली आहे. कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीनंतर वारंवार याबाबतचे मुद्दे समोर येत असून त्यामुळे पक्षाबाबत नाराजीचा सूर आहे. ही गटबाजी संपून एकसंधपणे काँग्रेस पक्ष जिल्ह्यात काम कधी करणार ? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे.