सावंतवाडी : आम्ही महाराष्ट्रात यायला केव्हाही तयार आहोत. पण विधानसभा उपाध्यक्ष यांनी तशी परवानगी दिली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्न उपस्थित राहिला असून आमच्या सुरक्षेची हमी कोण घेणार असा सवाल करत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या कायदाच व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्र येण्यासाठी केंद्राने आम्हाला सुरक्षा दिल्यास ती आम्ही स्वीकारू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मागच्या काळात जर माझे मंत्रीपद राऊतांमुळे गेले असेल तर आनंदच आहे असा टोला ही त्यांनी यावेळी हाणला. आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली.
केसरकर म्हणाले, पहिल्यापासून आमची भूमिका ही महाविकास आघाडी न करता भाजप बरोबर जाण्याची होती. शिवसेनेच्या नेतृत्वाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चाही घडवून आणण्याचा प्रयत्न मी केला. पण त्यात यश आले नाही. राज्यातील काही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आले. मात्र अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांना अधिकचा निधी दिला गेला आणि निवडून आलेल्या आमदाराला तसेच ताटकळत ठेवण्यात आले. हे आम्ही कसे काय खपवून घेऊ? शिवसेनेच्या कार्यक्रमांना खासदार आमदारांना निमंत्रण दिले जात नव्हते. हे योग्य नाही त्यांचा कुठे तरी राग आपल्या मनात ठेवून या सर्व आमदारांनी बंड केले आहे.
देशातील हे सर्वात मोठे बंड असून आता माघार नाही. पुढे काय होईल ते आमचे नेते एकनाथ शिंदेच ठरवतील, अशी स्पष्ट भूमिका केसरकर यांनी मांडली. आम्ही महाराष्ट्रात केव्हा यायला तयार आहोत पण येथील कायदा-सुव्यवस्था ही योग्य नाही. आमदार म्हणून आमचे संरक्षण होणार नसेल तर कसे यायचे?, असा सवाल करत विधानसभा अध्यक्ष जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही येऊ असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपणास मंत्रिपद मिळाले नाही. ते खासदार विनायक राऊत यांच्यामुळे असे मी मानत नाही. मला मंत्रीपद देऊ नये यासाठी राऊत यांनी प्रयत्न केला असेल तरी मला आनंदच आहे. पण अशी काही माणसे चुकीची माहिती पक्षप्रमुखांना देतात आणि त्यातून खरे काम करणारे कार्यकर्ते मागे राहतात. मातोश्री वर काही बडवे आहेत त्यातील एक विनायक राऊत का? असा उलटा सवाल केसरकर यांनी पत्रकारांना केला.
मी आज ही शिवसैनिकमी आज ही शिवसैनिक असून माझे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. पण काही माणसे आग पेटवतात पण मी विझवणारा असून कोकणात अनेक आंदोलने झाली दहशतवाद मोडून काढला. प्रेमाने जग जिंकता येते हा संदेश आहे. तो महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याचे मत ही केसरकर यांनी व्यक्त केले.