सावंतवाडी : माजी आमदार दीपक केसरकर हे मायनिंग उद्योगपतींकडून पैसा उकळून घरोघरी धान्य वाटप व मंदिरांना पैसे वाटप करीत आहेत. यासंदर्भात कागदोपत्री पुरावा असून तो योग्य वेळी सादर करू, असा इशारा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी माजी आमदार दीपक केसरकर यांना दिला आहे. तसेच दीपक केसरकर यांचा व्यवसाय काय, असा प्रश्नही परूळेकर यांनी उपस्थित केला आहे. येथील माजी खासदार नीलेश राणे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परुळेकर म्हणाले, बिहार, कर्नाटक, पंजाब या राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणुकीच्या निकालांवरून हे स्पष्ट होत आहे की, भाजपचा ‘अच्छे दिन...’ चा फुगा फुटत चालला आहे. रेल्वे भाडेवाढ, वाढती महागाई, पोकळ आश्वासने आदी अनेक मुद्द्यांमुळे मोदी सरकारची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. यामुळे मित्रपक्ष शिवसेनेलाही आता भाजपचा ‘अच्छे दिन...’ चा नारा पोकळ वाटू लागला आहे. एकीकडे दलित वाड्यांमध्ये गणेशोत्सवानिमित्त साखर, तेल व धान्य वाटायचे आणि विकासकामांबाबत विचारणा केल्यास फरफटत बाहेर काढायचे, हा केसरकरांचा दहशतवाद नाही का, असा सवाल यावेळी डॉ. परूळेकर यांनी उपस्थित केला. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या सावंतवाडीमध्ये शिवरामराजे भोसले, प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंत यासारखे आमदार होऊन गेले. मंत्रिपदापर्यंत गेले. म्हणूनच निवडणुका जिंकण्यासाठी, आमदार होण्यासाठी उमेदवार हा स्थानिकच असणे महत्त्वाचे आहे, असेही परूळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (वार्ताहर)
केसरकरांविरोधात कागदपत्रे सादर करू
By admin | Published: August 28, 2014 9:26 PM