सावंतवाडी : जिल्ह्याला प्रथमच मिळालेले गृहराज्यमंंत्री पद हे कोकणच्या विकासाचे नवे द्योतक असून, भयमुक्त आणि संस्कारशील कोकण निर्माण करण्यासाठी येथील राजकीय दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने पेलू. तसेच राज्यातील पोलिस दलाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच विशिष्ट काळात दहशत घालणाऱ्यांना कायमचा धडा शिकवून राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यास आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व नव्याने मिळालेल्या गृह खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. गृहखात्याचा कारभार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत नवीन खात्याच्या कारभाराबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शब्बीर मणियार, राकेश नेवगी, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, संस्कारशील कोकणातील सर्वसामान्य जनतेने अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जी वृत्ती दाखविली, त्यातूनच आपल्या कारभाराची सुरुवात झाली. आपणास राज्याचे नेतृत्व करण्याची मिळालेली संधीही त्याचाच भाग असून, उद्धव ठाकरे यांच्या कोकणावरील प्रेमामुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू विश्वासामुळेच हे पद आपणास मिळाले आहे. अलीकडील काही काळात कोकणाचे बदनाम झालेले नाव पुन्हा उजळण्याची ही संधी असून, त्याचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोने केले जाईल. राजकीय निवडणुकीदरम्यान काही विशिष्ट मंडळींकडून राडे घातले जातात, त्यांनाही आवर घालत भानावर आणून कोकणातील सर्वसामान्यांना भयमुक्त जगणे निर्माण करण्याची आपली विशेष मोहीम असेल. त्यामुळे अशा मंडळींनी याची दखल घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिस दलाच्या प्रलंबित अडचणींसह पोलिसांच्या सद्य:स्थितीतील राहत्या घरांची पाहणी करून त्यांची तात्पुरती आणि तत्काळ डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधा व पोलिसांसाठी आवश्यक साधनसामग्री पुरवून, पोलिस दल अधिक सजग करण्यावर आपला भर राहील. (वार्ताहर) ही धमकी नव्हे... अलीकडील काही वर्षांत दहशतीने जिल्ह्याचे नाव बदनाम झाले होते. कोकणचा समृद्ध व संस्कारशीलतेचा वारसा असा सहजासहजी मिटणारा नाही. अशा प्रवृत्तींना वेसन घालून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल आणि ही धमकी न समजता कोकणच्या खऱ्या संस्कृतीची प्रचिती असल्याचे ठामपणे केसरकर यांनी सांगितले. आरोप करणाऱ्यांचे काळे धंदे ४विरोधकांकडून अवैध धंद्यांच्या होणाऱ्या आरोपाला केसरकर यांनी आक्रमक होत, अवैध धंदे असणारेच जिल्ह्याचे व शहराचे नाव बदनाम करीत आहेत. ४त्यांनी वेळीच आपल्या जिभेला मर्यादा घालावी, अन्यथा बापूसाहेब महाराजांचा वारसा असणाऱ्या संस्कारी नगरीला गालबोट न लागण्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगितले.
कोकणातील दहशतीचे समूळ उच्चाटन करू
By admin | Published: July 11, 2016 12:03 AM