कणकवली , दि. ३ : तालुक्यातील तळेरे-गावठणवाडी येथील प्रशांत दत्ताराम सावंत याच्याकडे बिगर परवाना एक ठासणीची बंदूक, एक काडतुसाची बंदूक, १२ काडतुसे व दारूगोळा मिळून आला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी आपल्या पथकासह तळेरे-गावठणवाडी येथे धाड टाकली.
त्यांना एक ठासणीची बंदूक, एक काडतुसाची बंदूक, १२ काडतुसे व दारूगोळा मिळून आला. ही शस्त्र जप्त करण्यात आली असून संशयित आरोपी प्रशांत सावंत याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिसांनी सशस्त्र संचलन करून निवडणूकपूर्व खबरदारी घेतली आहे. निवडणुकांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून धमकावणे व तत्सम प्रकार होऊ नयेत या साठी बेकायदा शस्त्राची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक गेडाम यांनी दिल्या आहेत.