कणकवली: कोकण रेल्वे मार्गावरून अत्याधुनिक असलेली मडगाव ते मुंबई जाणारी 'वंदे भारत' एक्सप्रेस आता धावणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून व्ही.सी.द्वारे आज, हिरवा झेंडा दाखवला. गोवा, मडगाव येथून या गाडीचे कणकवली रेल्वे स्थानकात दुपारी १ वाजता आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच प्रवाशांनी जल्लोषी स्वागत केले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या एक्स्प्रेस मधून प्रवास केला.कणकवली रेल्वे स्थानकात' वंदे भारत' एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुगर्जना ढोल पथकाने ढोल, ताशांच्या गजरात फेर धरला. तर कणकवली बांधकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी कोकण रेल्वेच्या इतिहासावर आधारित पथनाट्य सादर केले.भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष तथा भजनी बुवा संतोष कानडे यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करणारे गीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विकासकामांचे वर्णन करणारी गीते सादर केली. त्यांना भजनी बुवा प्रकाश पारकर, संतोष मिराशी चव्हाण, मिलिंद मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर,सुशील सावंत आदींनी साथ केली. वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागतासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उस्फूर्तपणे गर्दी केली होती. मोबाईलच्या कॅमेऱ्यात वंदे भारत एक्सप्रेसचे छायाचित्र कैद करण्यासाठी तरुणांची लगबग सुरू होती.यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, कोकण रेल्वे क्षेत्रीय वरिष्ठ अभियंता रवींद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे आदींसह भाजपा कार्यकर्ते व रेल्वे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवलीत वंदे भारत एक्स्प्रेसचे जल्लोषी स्वागत
By सुधीर राणे | Published: June 27, 2023 4:26 PM