ओटवणे : गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे विलवडे-ख्रिश्चनवाडी येथील विहीर कठड्यासह जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या घरानजीकची ही विहीर पूर्णत: कोसळून बुजली गेली. १२ वर्षांपूर्वीची ही सार्वजनिक विहीर असून, या विहिरीवर ख्रिश्चनवाडीतील रहिवासी व जाधववाडी येथील १३ कुटुंबे गुजराण करतात. या विहिरींना मोटारपंपही जोडण्यात आला होता. गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीमुळे बुधवारी विहिरीच्या सभोवतालचा भाग अचानक खचत विहीर कठड्यासह जमीनदोस्त झाली. त्यामुळे पावसाळ्यातच या कुटुंबांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. पाणी गढूळ झाल्याने येणाऱ्या दिवसांत पाण्याचा गंभीर प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहणार आहे. या वाडीत काहीजणांकडे नळयोजनेचे कनेक्शन असून, इतर रहिवाशांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी) विहीर दुरुस्तीचे आश्वासन या विहिरीची लवकरात लवकर डागडुजी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ फ्रान्सिस फर्नांडिस, मनवेल फर्नांडिस, जॉनी फर्नांडिस, कोजम पाववाले, मदन कांबळे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे. दरम्यान, विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी यांनी पाहणी करून योग्य पंचनामा करून नुकसानभरपाईसहित दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.
विलवडेत विहीर कोसळली
By admin | Published: July 03, 2016 9:28 PM