कणकवली : जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात १२० नद्यांचे उगम झाले आहे. या नद्यांवर २ हजार ४८ धरणे असून, हायड्रोइलेक्ट्रीक प्रोजेक्ट उभारण्यात आले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उद्योगधंद्यांना उपयोग होत आहे. तसेच १२०० औषधी, तर ४५०० सपुष्प वनस्पती या भागात आहेत. पश्चिम घाट हा दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा परिसर वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींबरोबरच जनतेने आता संघटित होणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी येथे व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानफुलांच्या माहितीसह वामन पंडित यांनी काढलेल्या छायाचित्रांचे ‘रानफूल आणि पतंग’ या विषयावरील प्रदर्शन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. बाचुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कार्यशाळेत ‘पश्चिम घाटातील जैवविविधता’ या विषयावर ते बोलत होते.यावेळी डॉ. बाळकृष्ण गावडे, सचिन देसाई, विजय सावंत, अशोक करंबेळकर, डॉ. अनिल फराकटे, सुरेश कुऱ्हाडे, वामन पंडित आदी उपस्थित होते. डॉ. बाचुळकर म्हणाले, पश्चिम घाटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व आहे. पृथ्वीवर समप्रमाणात जैवविविधता पसरलेली नाही. त्यामुळे तिचे जतन करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. कोकणातील जमिनीच्या खाली सोने आहे. त्यामुळे दूरदृष्टीने त्याचा विचार करून येथील जनतेने आपल्या जमिनी विकू नयेत.निसर्गाचा समतोल टिकवायचा असेल तर जंगलमय भाग ३३ टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, भारतात तो ९ ते १० टक्केच आहे. मादागास्कर देशात १२ हजार सपुष्प वनस्पती असून, यापैकी ८ हजार वनस्पती फक्त त्याच देशात आहेत. जगात इतरत्र या वनस्पती कुठेही आढळून येत नाहीत. भारतात साडेसतरा हजार सपुष्प वनस्पती आहेत. त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. नष्ट झालेली वनस्पतीची प्रजात पुन्हा तयार करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गुजरातच्या पायथ्यापासून केरळपर्यंतचा भाग पश्चिम घाटात येतो. १६०० किलोमीटर लांबीचा हा प्रदेश असून सर्वसामान्य जनता जोपर्यंत शासनाला या पश्चिम घाटाचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत शासन ऐकणार नाही. राजकारण्यांच्या मागे असणारी जनता पर्यावरणतज्ज्ञांच्या मागे नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण होणे आवश्यक आहे. देशाच्या एकूण भूभागापैकी फक्त ५ टक्के एवढा भूभाग पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. हा भाग वगळून शासनाने हवे तर कोठेही उद्योगधंदे उभारावेत. त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. पश्चिम घाटांतर्गत महाराष्ट्रात येणाऱ्या भागात लवकर वाढ होणाऱ्या झाडांच्या अनेक प्रजाती आहेत. मात्र, त्याचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे निलगिरीसारख्या झाडांची लागवड आपण करीत असतो. या लागवडीमुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत.रस्त्याच्या बाजूला तसेच बागेत अनेक विदेशी झाडे लावलेली आढळतात. त्यांचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपल्या भागातील झाडांची लागवड अशा ठिकाणी झाल्यास त्यापासून उत्पन्नही मिळू शकेल. अनेक औषधी वनस्पती पश्चिम घाटात असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ पद्धतीने जनतेमध्ये पश्चिम घाटाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी संघटीतपणे प्रयत्न करावेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखावा, असे आवाहनही त्यांनी केले.दुसऱ्या सत्रात ‘वनस्पतीपासून नैसर्गिक रंगनिर्मिती’ या विषयावर डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शन मंगळवारपर्यंत सुरु राहणार आहे. (वार्ताहर)बायोडायव्हर्सिटी बोर्ड आवश्यकबायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे रक्षण होण्यासाठी किमान जिल्हा पातळीवर तरी बायोडायव्हर्सिटी बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपल्या भागातील औषधी गुणधर्म असलेल्या तसेच बहुउपयोगी वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करता येईल. तसेच काहीजणांकडून होणारी लुबाडणूकही थांबेल, असे यावेळी डॉ. बाचुळकर यांनी सांगितले.
पश्चिम घाट दक्षिण भारताच्या अर्थकारणाचा कणा
By admin | Published: April 12, 2015 10:18 PM