सावंतवाडी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपचे नेते रोजगारच्या मुद्द्यावर संवेदनशील आहेत. आडाळीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून चांगले उद्योग येत आहेत. राज्य सरकारकडून देखील प्रयत्न सुरु आहेत असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यात नाहक वातावरण बिघडू नये सल्ला माजी आमदार राजन तेली यांनी दिला आहे. चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी कोकणासाठी काय केले असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.तेली म्हणाले, भाजप कडून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले आहे मात्र शहरांतल्या अर्चना घारेनी आदी गावं आणि गावाचे प्रश्न समजून घ्यावेत. लोकांच्या ओळखी वाढवाव्यात. नंतर टीका करावी तब्बल ६३ वर्षे राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आहे तर पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत, असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी नेमके काय केले..? याचे उत्तर द्यावे.महाविकास आघाडीची सत्ता असताना दोडामार्ग तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न अर्चना घारेनी किती वेळा मांडला? आडाळी एमआयडीसीचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला नाही. आता निवडणुक लढवायची आहे म्हणून जनतेला गाजर दाखवायचे उद्योग करु नका. कारण महाविकास आघाडीने आडाळी एमआयडीसीला कधीच महत्व दिल नाही. उद्योग आणण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, याची जाणीव स्थानिकांना आहे. आघाडी शासनात राष्ट्रवादीच्याच आदिती तटकरे या उद्योग खात्याच्या राज्यमंत्री होत्या, हे अर्चना घारे यांना माहिती नव्हतं कां? त्यावेळी स्वतःच्या पक्षाकडे उद्योगमंत्रीपद असताना आडाळी एमआयडीसी त्यांना दिसली नाही. आणि आता भाजपने एमआयडीसीचा मुद्दा लावून धरल्यावर त्यांना रोजगाराचा प्रश्न दिसू लागला.भाजपवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेच्या हस्ते विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किट वाटप केले, हा विरोधाभास कशाला मग? केंद्रातील योजनाचा लाभ मिळवून देताना भाजपवर टीका करतात, हा दुटप्पीपणा जनतेला कळतो, याचं भान अर्चना घारेनी ठेवाव. अजित पवार बाहेर पडल्यानेच पवार कुटूंबाला उर्वरित राज्य दिसू लागले. अन्यथा बारामती च्या विकासापलीकडे त्यांनी कधी विचार देखील केला नाही.अशी टीका तेली यांनी यावेळी केली.
सिंधुदुर्गातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम, राजन तेलींचे प्रत्युत्तर
By अनंत खं.जाधव | Published: October 28, 2023 4:42 PM