कणकवली : सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पॉवर टिलर सारखी अवजारे तातडीने मिळणे आवश्यक आहे . मात्र , ३० जून पर्यंत अर्ज मागविल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून अवजारे वितरित करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला विलंब होणार असून शेतीचा हंगाम संपणार आहे. हा हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना अवजारांची आवश्यकता राहणार आहे का ? असा संतप्त सवाल मंगेश सावंत तसेच इतर पंचायत समिती सदस्यांनी विचारला. तसेच याबाबत साधकबाधक विचार करून जिल्हा पातळीवर तत्काळ निर्णय घ्या.अशी मागणीही यावेळी केली.कणकवली पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुजाता हळदीवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती पाटील , उपसभापती सुचिता दळवी उपस्थित होते.या सभेत कृषी विभागाकडून खरीप हँगमाबाबत माहिती देण्यात आली .तसेच शेतकी अवजारे मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊन अवजारे शेतकऱ्यां पर्यंत पोहचायला विलंब होणार आहे. त्यामुळे फक्त कागदावरच योजना राबवू नका. शेतकऱ्यांना काय आवश्यक आहे ते बघा असे सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी शेतकी अवजारांविषयी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल असे तालुका कृषी अधिकारी राठोड यांनी सांगितले.कणकवली तालुक्यात रस्त्यालगत टाकलेल्या जिओ केबलमुळे ठिकठिकाणी माती रस्त्यावर आल्याचा मुद्दा गणेश तांबे यांनी उपस्थित केला. या केबलसाठी चर खोदल्याने अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे.रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मीटर अंतरावर केबल टाकायची असतानाही जिओ केबल टाकण्याचे काम घेतलेला ठेकेदार नियम धाब्यावर बसवून काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही गणेश तांबे यांनी केला. तर मनोज रावराणे यांनी या मुद्यावरून शाखा अभियंत्यांना धारेवर धरले.यावेळी संबधित कामाची चौकशी करण्यात येईल . तसेच ठेकेदाराने चर व्यवस्थित बुजविले नसतील तर त्याला नोटीस काढण्यात येईल. त्याचबरोबर ठेकेदाराच्या अनामत रकमेतून संबधित काम करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.तालुक्यातील विजवीतरणचे जीर्ण खांब , खंडित वीजपुरवठा, वाघेरी-लोरे विजवाहिनी , वाढीव विजबिले, ओसरगाव ट्रान्सफार्मर, विजेचे कमी भरमान आदींबाबत पंचायत समिती सदस्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता भगत यांना यावेळी जाब विचारला. वाढलेली झाडी तोडण्याचे काम मान्सूनपूर्व का केले नाही ? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता भगत यांनी विजवीतरण संबधित समस्या तत्काळ सोडविण्यात येतील असे सांगितले.कणकवली तालुका पाणी टँचाई आराखड्या अंतर्गत ६५ वाडयांसाठी ५९ लाख १० हजार रुपये खर्चाचा पूरक आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र त्याला मंजुरी मिळालेली नाही . असे सांगत यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई बाबतच्या कामांचा आढावा सादर केला.
नळयोजना दुरुस्तीच्या १५ कामाना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी १ काम पूर्ण झाले असून ३ कामे प्रगतीपथावर आहेत. ११ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. विहिरीतील गाळ काढणे ९ कामे मंजूर झाली होती. त्यापैकी ७ कामे पूर्ण झाली असून १ काम प्रगतीपथावर आहे. तर एका कामासाठी लागणारी अंदाजित रक्कम जास्त असल्याने ते होऊ शकलेले नाही.
विंधन विहिरींची १३ कामे मंजूर झाली होती. त्यातील पाच कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तर ५ कामांच्या जागेचे बक्षीस पत्र अजूनही झालेले नाही. ३ कामांच्या जागेचे बक्षीस पत्र झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी आता पाऊस सुरू झाला आहे. मग ही कामे कधी पूर्ण करणार ? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला.कणकवलीतील जिल्हापरिषद शाळा नंबर ६ भाड्याच्या इमारती मध्ये चालते. त्या इमारतीच्या मालकाने आपली जागा खाली करून द्यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे संबधित शाळेतील मुलांना जिल्हापरिषद शाळा नंबर २ मध्ये वर्ग करण्यात यावे. असा मुद्दा या सभेत उपस्थित झाला होता.
यावेळी मनोज रावराणे तसेच इतर सदस्यांनी संबधित विषयावर निर्णय घेण्यापूर्वी त्याभागातील नगरसेवक , सभापती, गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी , पालक यांची एकत्रित बैठक घ्यावी आणि सर्वानुमते निर्णय घ्यावा असे सुचविले.तालुक्यात आता पर्यंत ६२० क्विंटल भात बियाणे वाटप करण्यात आले आहे. तर ६९० मेट्रिक टन खत वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी सुभाष पवार यांनी दिली. यावेळी नांदगाव येथे कायमस्वरूपी कृषी सहाय्यक द्यावा .अशी मागणी हर्षदा वाळके यांनी केली. तर सध्या भात पेरणी सुरू असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी सहाय्यकानी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित रहावे .असे भाग्यलक्ष्मी साटम यांनी सुचविले. त्याला कृषी अधिकारी राठोड यांनी अनुमती दर्शविली.सध्या पावसाळा सुरू असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पाटील फक्त एकच दिवस रुग्णालयात हजर असतात. त्यांनी आठवडाभर सेवा देणे अपेक्षित आहे. रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष म्हणून तुम्ही याबाबत काय कार्यवाही करणार ? असा प्रश्न मिलिंद मेस्त्री यांनी विचारला . याबाबत चौकशी करण्यात येईल तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना त्याबाबत कळविण्यात येईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या सभेत दूरसंचार सेवा, ऑफलाईन दाखले, रस्त्यावरील खड्डे अशा इतर विषयांबाबतही चर्चा झाली.जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा !तालुक्याच्या पाणी टंचाईच्या मूळ आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण झाली का ? असा प्रश्न मनोज रावराणे यांनी या सभेत विचारला. त्यावेळी काही कामाना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही .असे अधिकाऱ्यांनी सांगीतल्यावर सर्वच पंचायत समिती सदस्य संतप्त झाले. आमदार नितेश राणे यांनी आढावा बैठकीच्या वेळी सूचना देऊनही कामे होत नसतील तर त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा . अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. तसेच त्यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या मुद्यावरून धारेवर धरले. त्यामुळे सभागृहातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता.