कणकवली : एकाच व्यासपीठावर बसून आधी मैत्री साधायची. एकमेकांची स्तुती करायची, अशी कृती आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. परंतु खासदार राऊतांशी मैत्री साधत त्यांच्याच पक्षातल्या आमदार दिपक केसरकरांना इडीची धमकी देणाऱ्या आमदार राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या केविलवाण्या अवस्थेकडे सत्ताधारी आणि विरोधक असलेले लोकप्रतिनिधी सोईस्कर रित्या दूर्लक्ष करीत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला आहे.परशुराम उपरकर यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एकाच व्यासपीठावर आणि एकाच बाकावर बसून आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी मैत्री साधली.
परंतु त्यानंतर काहीच दिवसांनी आमदार राणे यांनी सावंतवाडी येथे जात आमदार दिपक केसरकरांना इडीची चौकशी लावण्याची धमकी दिली. यातून या साऱ्या लोकप्रतिनिधींचा स्वार्थी चेहरा समोर येत आहे. ही मैत्री केवळ स्वार्थासाठी होती. विकासासाठी नव्हती. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा स्टंट होता, हे जनतेने आता ओळखून जावे.मुंबई - गोवा महामार्गाच्या गटारांची दूर्दशा झाली आहे. महामार्गालगतची शेती पाण्याखाली गेल्याने पिक कुसून गेले आहे. एस. एम. हायस्कूलसमोरील उड्डाणपूल मागील वर्षी खचून गेला होता. यावर्षीही तिच गत झाली आहे. महामार्गाची जमिन संपादन करण्यासाठी आणि महामार्ग हस्तांतर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्परतेने काम केले.
जागा संपादन न झालेल्या ठिकाणीही काम चालू करण्यासाठी दिलीप बिल्डकॉनची मदत केली. टोलनाके आपल्या मुलाला चालवायला देण्याचे त्यांचे नियोजन आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीकडे १५ वर्षे महामार्ग देखभालीसाठी असतो. त्यातील एक वर्ष असे पडझडीतच गेले आहे.
महामार्गाच्या मध्यभागी आणि बाजूला झाडे लावायची होती. पण तेही काम पूर्ण झाले नाही. अपुऱ्या कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. महामार्ग कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम योग्य रितीने न केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नांदगाव येथे महामार्गालगत असलेल्या घरांत तर पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकॉनला महामार्गाच्या या दुरावस्थेबाबत जाब न विचारता त्याची वकीली करतानाच हे लोकप्रतिनिधी दिसतात.महामार्गाच्या कामांसाठी निधी येतो. मग कामे अपुरी का राहतात? कारण महामार्गाच्या या दूरावस्थेकडे सत्ताधारी व विरोधक लोकप्रतिनिधी सोईस्कर दूर्लक्ष करत आहेत, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे. तसेच आता केवळ निवेदनाने प्रश्न सुटणार नाहीत.
महामार्गाच्या प्रश्नांबाबत खासदार, आमदार, मंत्री यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला पाहिजे. तरच हे महामार्गाशी संबंधित असणारे प्रश्न चव्हाट्यावर येतील आणि सुटतील, असेही मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.