राजापूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजापूर तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांचा राजीनामा पक्षाने स्वत:हून मंजूर केला की तसे करण्यास भाग पाडण्यात आले? याबाबत उलटसुलट शंका - कुशंकाना राजापुरात अधिकच जोर आला आहे. आजवर तालुक्यात पक्षाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याची प्रतिक्रिया अनेक बुजूर्ग काँग्रेसजनांनी व्यक्त केली आहे. सोमवार, २४ रोजी राजापूर दौऱ्यावर येत असलेले माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे झाल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करणार असल्याचे समजते.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदीर्घ काळ याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. दिनांक २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावर निर्णय घेताना हा राजीनामा मंजूर केला. मात्र, राजापूर तालुकाध्यक्ष नागरेकर यांचा राजीनामा मंजूर केल्याचे पत्र त्यांना अद्याप पाठविण्यात आलेले नाही, असे नागरेकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावरुन चांगलीच खळबळ उडाली आहे.दिनांक २३ सप्टेंबर रोजी झालेल्या या राजीनामा निर्णयावर एवढे दिवस लोटले तरीही त्याबाबत नागरेकर यांना कल्पना का देण्यात आली नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम अधिकच वाढत चालला आहे.काँग्रेसच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनाही पक्षाच्या त्या निर्णयाचा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर राजापूरची जबाबदारी असलेले माजी खासदार नीलेश राणे हे सोमवारी राजापुरात येत असून, तालुकाध्यक्ष बदलाच्या या कथित नाट्यामुळे नाराज काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आपली नाराजी त्यांच्यापुढे मांडण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर नीलेश राणे यावर कोणती भूमिका घेतात, त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे. (प्रतिनिधी)
नागरेकरांच्या राजीनाम्यामागे ‘दडलंय काय?’
By admin | Published: October 23, 2016 12:21 AM