सावंतवाडी : भाजप सरकारने मागील नऊ वर्षात अनेक विकासाचे प्रकल्प देशात उभारले आहेत. मात्र विरोधकांना चांगलं काही दिसत नाही निवडणुका आल्या की फक्त ईडी आणि सीबीआय च्या माध्यमातून विरोधी पक्षांना त्रास देतात अशा प्रकारची भाजपची बदनामी सुरू केली जाते. पण याला जनता बळी पडणार नाही. हे तीन राज्यातील विजयानंतर दिसून आले असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला.ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आज, शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत जोडो यात्रे वरून काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रेवर आली असल्याची टीका ही त्यांनी केली. यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री मिश्रा म्हणाले, मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची संकल्पना सर्व सामान्य जनते पर्यत पोचवली. त्यामुळेच देशात मोदींबद्दल सर्वसामान्य जनतेत गॅरंटी निर्माण झाली असून मोदी हेच गॅरंटीचे दुसरे नाव असल्याचे तीन राज्यानी दाखवून दिले. तेलंगणा आणि मिझोराममध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असेही मिश्रा यांनी सांगितले. काँग्रेस आता उत्तर प्रदेश जोडो यात्रा काढत आहे मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस फक्त पन्नास मतदार संघापुरती राहिली असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.
ईडीकडून आजपर्यंत १ लाख ३६ हजार कोटींची बेनामी संपत्ती जप्त ईडी, सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा आहेत. आज पर्यत ईडीच्या माध्यमातून १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पण विरोधकांना हे दिसत नाही. ईडी, सीबीआयचा वापर भाजप करत असल्याचा आरोप करून भाजपची बदनामी सुरू आहे. पण देशातील जनतेला सर्व काही माहीत असून जनता सुज्ञ असल्याचे मंत्री मिश्रा म्हणाले.
दोषींवर कारवाई होणारचउपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची चौकशी होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर मात्र मंत्री मिश्रा यांनी त्रोटक उत्तरे दिली. ईडी सीबीआयच्या चौकशीत जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई होईलच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.