कनेडी : पूर्ण प्राथमिक शाळा नाटळ राजवाडीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने विद्यार्थी कोठे बसविणार, ही समस्या शिक्षक व पालकांना भेडसावत आहे. शासन दरबारी वारंवार दाद मागूनही शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे. पालक आपली मुले शाळेत न पाठविण्याच्या पवित्र्यात आहेत.राजवाडी प्राथमिक शाळा ही केंद्रशाळा असून इतर शाळांच्या सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा महोत्सव याच शाळेत भरविले जातात. सध्या ही शाळा सात खोल्यांची असून पूर्णपणे मोडकळीस आली आहे. गेली दोन वर्षे वारंवार छप्पर दुरूस्तीबाबत शाळा समितीच्या तसेच शिक्षकांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. परंतु त्या प्रस्तावांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. एकही प्रस्ताव विचारात घेण्यात आला नसल्याचे शाळा समिती अध्यक्ष रमेश सावंत यांनी सांगितले.या शाळेचा लाभ सहा ते सात वाड्यांना होत आहे. बहुजन समाजवस्तीतील विद्यार्थ्यांना या शाळेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. शाळेत बहुतांश विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. शाळेच्या पडझडीमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शाळेत एक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व एक उपशिक्षक अशी पदे भरण्यात आली असून २० च्या पटीत विद्यार्थी संख्या आहे. पूर्वी ही शाळा सातवीपर्यंत होती. परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या घटत गेली. शासनाने विद्यार्थी पटसंख्येअभावी ही शाळा चौथीपर्यंत करण्याचे आदेश दिले. सात वर्गखोल्यांची शाळा एकदाही दुरूस्त करण्यात आली नाही. परिणामी शाळेची दूरवस्था झाली. दुरूस्तीबाबत शाळा समितीने वारंवार प्रस्ताव पाठविले. परंतु एकाही प्रस्तावाचा विचार शासनाने व लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. (वार्ताहर)विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोक्याचेसध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी सर्व खोल्यांमधून येऊन शैक्षणिक साहित्य तसेच खेळाचे साहित्य खराब होत आहे. विद्यार्थ्यांना बसण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पालक, विद्यार्थी व शिक्षक द्विधा अवस्थेत आहेत. पालकांना पाल्यांचा शैक्षणिक नुकसानीबाबत भीती वाटत आहे. शाळेच्या छपराचे वासे, रिप वाळवी लागून खराब झाले आहेत. बहुतांश कौले खाली पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू होण्यास काही थोडेच दिवस असताना शाळा दुरूस्तीबाबत शासन गप्प बसले आहे. शाळेची डागडुजी केव्हा करणार? की एखादा अपघात झाल्यावर शासनाला जाग येणार? शाळेची डागडुजी शाळा सुरू होण्याअगोदर करावी, अन्यथा एकही मूल शाळेत पाठविणार नाही.- रमेश सावंत शाळा समिती अध्यक्ष
विद्यार्थ्यांना बसविणार कोठे ?
By admin | Published: June 11, 2015 11:10 PM