कणकवली : राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्याने कोणीही राज्यस्तरीय व्यक्ती ठरत नाही. संदेश पारकर हे जिल्हा काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते असल्यानेच त्यांना पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी नोटीस काढली असून, हा माझा जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकार आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता जिथे संदेश पारकर, तिथे अपयश असेच समीकरण दिसून येत असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.संदेश पारकर यांना पक्षविरोधी काम करीत असल्याने नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सतीश सावंत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी उत्तर दिले.ते म्हणाले, २७ जानेवारी २०१३ रोजी कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संदेश पारकर यांनी पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित होते. या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणे म्हणजे राज्यस्तरावरील नेता असे होत नाही. पारकर बाजारपेठ मित्रमंडळाचे राष्ट्रीय नेते असू शकतील. त्यांची हद्द पटकीदेवी मंदिरापर्यंतच आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांपैकी कितीजण पक्षात आहेत याची आकडेवारी जाहीर करावी. प्रसिद्धी मिळण्यासाठी त्यांनी टीका करण्याचा खटाटोप चालविला आहे.सन २००९ च्या निवडणुकीत कणकवली शहरातून काँग्रेसला झालेल्या मतदानापेक्षा २०१४ मधील मतांमध्ये घट झाली आहे. फोंडा, खारेपाटण, कसाल, रेडी, माणगाव, आदी परिसरात लोकसभा निवडणुकीच्यावेळी पारकर यांनी पदयात्रा काढली होती. त्यांनी जिथे प्रचार केला, त्या भागात काँग्रेसला मतदान कमी झाले आहे. आमदार नीतेश राणे यांचा विजय हा त्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. त्यामुळे या विजयाचे श्रेय जर पारकर घेत असतील, तर नीलेश राणे यांना मिळालेल्या कमी मताधिक्याचे श्रेयही त्यांनीच घेणे आवश्यक आहे. पारकर यांना राष्ट्रवादीत असताना १३ वर्षांत कोणतेही महामंडळ राष्ट्रवादीने दिले नाही. मात्र, नारायण राणे यांनी अवघ्या तेरा महिन्यांच्या आत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झगडून पारकर यांना महामंडळ दिले. आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेस जिल्हाध्यक्षांना हे महामंडळ दिले जाते. मात्र, पक्षवाढीसाठी मी ते पद घेतले नाही. सुभाष बने, गणपतराव कदम नाराज होऊन पक्षापासून यामुळेच दूर गेले. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पारकरांनी पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. जर पारकर काँग्रेसमध्ये असतील, तर कणकवली नगरपंचायतीतील राणेंचे फोटो काढण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट करावे. (वार्ताहर)त्याबाबतचा निर्णय प्रदेश काँग्रेस घेईलविजय सावंत हे आमदार असल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय प्रदेश काँग्रेस घेईल. जिल्हास्तरावर त्याबाबतचा निर्णय होऊ शकणार नाही, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले....तर संदेश पारकर आरपीआयमध्येही जातीलकोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्षपद आरपीआयच्या वाट्याला आले तर संदेश पारकर त्या पदासाठी आरपीआयमध्येही जातील, असा उपरोधिक टोला सतीश सावंत यांनी यावेळी लगावला.
जिथे पारकर, तिथे अपयश : सावंत
By admin | Published: December 08, 2015 12:11 AM