कणकवली : बनावट कुलमुखत्यारप्रकरणी होणार असलेल्या कारवाईतून सवलत देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न करताना सांगवे सरपंच महेंद्र हरी सावंत याच्यासह निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मालाजी परब याला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. येथील पोलीस ठाण्यातच आज, शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. तालुक्यातील सांगवे गावचा सरपंच महेंद्र हरी सावंत (वय ३४), प्रभाकर महादेव सावंत (दोघेही रा. संभाजीनगर, सांगवे) व साक्षीदार यांनी संगनमताने शांताराम गोपाळ सावंत यांच्या नावे असलेल्या गट नं. १०४७ या २० गुंठे जमिनीचे शांताराम सावंत यांच्या नावाने खोटे कुलमुखत्यारपत्र तयार केले. त्यावर प्रभाकर सावंत यांनी स्वत:चा फोटो व अंगठा लावून शांताराम सावंत यांची सहीसुद्धा केली. या बनावट मुखत्यारपत्राच्या आधारे ही जमीन रमेश सखाराम धुरी यांच्या नावे खरेदीखत करून विक्री केली आणि रक्कम हडप केली होती. शांताराम सावंत यांची सांताक्रुझ-मुंबई येथील मुलगी दर्शना दिगंबर तावडे (४७) यांनी याप्रकरणी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार महेंद्र सावंत याच्यासह तिघांवर ४२० कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी हे महेंद्र सावंत याचा शोध घेत होते. दरम्यानच्या कालावधीत महेंद्र सावंत याने आपल्या बहिणीचा पती निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मालाजी परब (६३, रा. ठाणे) याच्या मध्यस्थीने लांगी यांच्याशी संपर्क साधला. अटक टाळण्यासाठी, अटक झाल्यास लॉकअपमध्ये न ठेवता रुग्णालयात ठेवण्यासाठी आणि गुन्ह्यात सुटण्यासाठी पळवाट ठेवण्यासाठी दोन लाख रुपये देण्याची त्याने तयारी दाखवली. यानंतर एपीआय लांगी यांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क केला. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कणकवली पोलीस ठाण्यातच महेंद्र सावंत याला पैसे घेऊन बोलावले. आज सकाळी महेंद्र सावंत व सुधाकर परब दोन लाख रुपये घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक लोकेश कानसे आणि दोन पंच साध्या वेशात पोलीस ठाण्यात उपस्थित होते. महेंद्र सावंतने उपस्थितांवर आक्षेप घेतला असता एपीआय लांगी यांनी ते मृताचे नातेवाईक असल्याचे सांगितले. सावंतने पैसे देण्याचा प्रयत्न करताना अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. दुपारी सव्वाएकच्या सुमारास ही कारवाई झाली. ‘लाचलुचपत’चे डीवायएसपी विराग पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, हवालदार प्रकाश सुतार, सहायक पोलीस फौजदार भाऊ घोसाळकर तसेच सिंधुदुर्ग ‘लाचलुुचपत’चे हवालदार मकसूद पिरजादे, केनॉन फर्नांडिस, आदींनी या कारवाईत भाग घेतला. उद्या, रविवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू होती. (प्रतिनिधी)
लाच देताना सांगवे सरपंचाला अटक
By admin | Published: June 08, 2014 1:01 AM