मालवण : वराड कुसरवेवाडी येथील जमिनीची आकारफोड करण्यासाठी सुधाकर गंगाराम गावकर (रा. वेंगुर्ले गावडेवाडी) या आंबा व्यावसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मालवण भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक शिवाजी पांडुरंग मोंडकर (वय ५७, रा. उत्कर्षनगर पिंगुळी, कुडाळ) यांना मालवण येथील कार्यालयात ओरोस येथील लाचलुचपत विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. सहा वर्षांपूर्वी याच कार्यालयातील कर्मचारी जगन्नाथ लक्ष्मण मोंडकर यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. मालवणचे भूमी अभिलेख कार्यालयात अर्थपूर्ण व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. अशा आशयाची चर्चा गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणावर सुरु होती. मालवणचे भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक शिवाजी पांडुरंग मोंडकर हे उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मालवणबरोबरच त्यांच्याकडे वेंगुर्ले कार्यालयाचाही कार्यभार आहे. वेंगुर्ले गावडेवाडी येथील आंबा व्यावसायिक सुधाकर गंगाराम गावकर यांची वराड कुसरवेवाडी येथे सर्व्हे नं. ७८ मध्ये आठ गुंठे जमीन असून या जमिनीची आकारफोड करण्यासाठी गावकर यांनी ७ डिसेंबर २०१३ रोजी मालवण भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. आकारफोड करण्यासाठी जमीन मोजणीकरीता गावकर यांनी शासकीय नियमाप्रमाणे ४ हजार रुपयांचे शुल्क भरले होते. शिवाय या जमिनीचे सहहिस्सेदार अभिजीत यांनी दोन हजार रुपये भरले होते. २०१३ पासून सुधाकर गावकर यांचे आकारफोड जमीन प्रकरण प्रलंबित होते. या कामासाठी गावकर हे वारंवार मालवण कार्यालयात खेटे घालत होते. गावकर यांनी आपले काम लवकर करावे अशा आशयाची विनंती मोंडकर यांच्याकडे केली होती. यावेळी मोंडकर यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.गावकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धावजमिनीची आकारफोड कायद्याने सुलभरित्या होते. त्यासाठी गावकर यांनी भूमी अभिलेख कार्यालय मालवणकडे रितसर कागदपत्रे दाखल केली होती. रितसर कागदपत्रे दाखल करूनही पैशाची मागणी केली जाते म्हणून गावकर यांनी कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्लॅन रचला.गावकर हे सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मालवण येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात आले व त्यांनी मोंडकर यांची भेट घेतली. मोंडकर यांनी मागणी केल्याप्रमाणे गावकर यांनी त्यांना पाच हजार रुपये दिले. हे पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून मोंडकर यांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मुकुंद हातोटे, पोलीस निरीक्षक मोतिराम वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. राणे, पोलीस कॉन्स्टेबल कैतान फर्नांडिस, आशिष जामदार, सुनिल देवळेकर, महेश दळवी, निलेश परब यांनी केली.मोंडकर यांना अटकजमिनीची आकारफोड करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेण्याच्या आरोपाखाली मालवण भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक शिवाजी मोंडकर यांच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मोंडकर यांच्या कुडाळ पिंगुळी येथील मालमत्तेचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)भूमिअभिलेखमधील दुसरी घटना सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २७ आॅक्टोबर २००९ रोजी या कार्यालयातील परिरक्षण भूमापक जगन्नाथ लक्ष्मण मोंडकर यांना रविकिरण तोरसकर यांच्याकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सोमवारी २७ एप्रिल २०१५ रोजी उपअधीक्षक शिवाजी मोंडकर यांनाही लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
लाच घेताना उपअधीक्षकास पकडले
By admin | Published: April 27, 2015 10:35 PM