सिंधुदुर्गनगरी : शिक्षकांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील ४२६२ शिक्षकांना ड्रेसकोड लागू करणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे संतापलेल्या शिक्षक संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. ड्रेसकोड हा विषय सध्या सभांमध्येही गाजू लागला असून याबाबतच्या चर्चाही वादळी स्वरूपाच्या होत आहेत. कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शिक्षकांना लागू केलेला ड्रेसकोडच्या नव्या धोरणामुळे शिक्षक संघटना नमणार की ड्रेसकोडचा निर्णय मागे घेण्यास शिक्षक संघटना भाग पाडणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश रंग बदलाबाबतचा निर्णय झाल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून नवीन गणवेशात मुले दिसणार आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांमध्येही एकसूत्रता यावी यासाठी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबत शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ड्रेसकोड लागू करू नये यासाठी शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन सादर केले आहे. अशाप्रकारे प्राथमिक शिक्षकांचा ड्रेसकोड ऐरणीवर आला असून तो वादग्रस्त ठरला आहे. याबाबत आता जिल्हा परिषद पदाधिकारी आणि शिक्षक संघटना असा नव्याने वाद रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे आता शिक्षण सभापती पेडणेकर यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार की, शिक्षक संघटनांच्या दबावाखाली निर्णय मागे घेणार याबाबत आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. शिक्षण समितीमध्ये सर्व सदस्यांच्या संमतीने सर्व शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकवाक्यता रहावी हा त्यामागचा उद्देश होता. फक्त शाळेच्या वेळेतच हा ड्रेस (अॅप्रन) घालावा व शाळा सुटल्यानंतर तो शाळेतच ठेवावा असेही ठरले होते. मात्र, जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी याला विरोध करत हा शासनाचा निर्णय नसून फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा निर्णय लागू करू शकत नाही असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. १७ एप्रिल रोजी झालेल्या शिक्षण समिती सभेत ‘ड्रेसकोड’बाबत चर्चादेखील झाली. आम्हाला जर शिक्षकांना ‘ड्रेसकोड’ वापरण्यास सक्तीच करायची असती तर आम्ही केली असती. परंतु आम्ही तसे केले नाही. आम्हाला वाद नकोत म्हणून आम्ही सामंजस्याने हे प्रकरण हाताळायला बघतो. आता याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न करा असे सभागृहात सभापती गुरुनाथ पेडणेकर व सदस्य सतीश सावंत यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०१५) शिक्षकांनी ड्रेसकोड वापरावेत अशा सूचना दिल्या आहेत. तर शिक्षक संघटनांनी ‘ड्रेसकोड’ (गणवेश) वापरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आपल्या निर्णयावर कोण ठाम राहतो शिक्षण सभापती की शिक्षक संघटना याबाबत लवकरच निर्णय होणारआहे. (प्रतिनिधी)जबाबदारी वाढलीजिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा घसरलेला दर्जा आणि सेमी इंग्रजीसारख्या महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषद प्रशासनाला आलेले अपयश आणि ९३ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम बंद करण्याची नामुष्की पाहता उर्वरित शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम टिकवून ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यातच ड्रेसकोडचा मुद्दा ऐरणीवर आल्याने आता वादग्रस्त ठरलेल्या ड्रेसकोडबाबत कोण माघार घेणार असा नवा प्रश्न उपस्थित होत आहे.गिरीष परब
ड्रेसकोड विषयापुढे झुकणार कोण?
By admin | Published: April 19, 2015 9:32 PM