गतवर्षी म्हणजे २ आॅगस्ट २0१४च्या ‘कोकण किनारा’मध्ये ‘पुढच्याला ठेच, तरी मागचे मूर्खच’ या शीर्षकासह भ्रष्टाचारी लोकांच्या प्रवृत्तीबद्दल लिहिले होते. वर्षभरात या परिस्थितीत कसलाही फरक पडलेला नाही. याआधीही पडला नव्हता आणि यापुढेही पडणार नाही. लाचखोरांना शहाणपण येणार नाही. ते सतत पकडले जाणार आणि एक पकडला गेला तरी पुढचे पुढचे पैसे खातच राहणार. याला काहीच पर्याय नाही? हे फक्त शांतपणे पाहात राहायचं? या साऱ्याला कधी ना कधी अंत आहे की नाही? एखाद्या लाचखोराला रंगेहाथ पकडल्याची बातमी वर्तमानपत्रात आल्यानंतर दुसरा सावध होईल की नाही? किमान काही काळ तरी गप्प बसेल. पण या लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांची भूक बकासुराची भूक आहे. ती थांबतच नाहीये. बकासुराला रोखण्याचा मार्ग शोधायलाच हवाय.मध्यंतरी एकदा वाचनात आले होते, भ्रष्टाचार सरकारमान्य केला तर? काय होईल, याचे विश्लेषणही लेखकाने केले होते. सातबारा उतारा मिळवण्यासाठी तलाठ्याला ५0 रूपये द्यायचेच. नेहमीप्रमाणे रांग लागेल. ५0 रूपये घेतलेले लोक रांगेत असतील. रांगेतल्या शेवटच्या माणसाला घाई असेल आणि तो पुढे येऊन म्हणेल, हे सगळे ५0 रूपये घेऊन आलेत. मी १00 देतो, पण माझं काम आधी करून दे. म्हणजे भ्रष्टाचार सरकारमान्य केला तरीही त्यात भ्रष्टाचार होेईल. म्हणजेच भ्रष्टाचाराला आपण सर्वसामान्य माणसेच जबाबदार आहोत. हे थांबवणं आपल्या हातात नाही का?लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्याच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बातम्या गेल्या वर्षभरात वर्तमानपत्रात आल्या. अगदी मागच्याच आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने सावंतवाडीत एका पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले. ही घटना ताजी असतानाही राजापूरच्या तहसीलदाराने शेण खाल्ले. आतापर्यंत तलाठी, मंडल अधिकारी यांच्या बातम्या येत होत्या. पण भ्रष्टाचाराच्या माळेतील हे छोटेसे मणी आहेत. या माळेतले महामेरू कायमच नामानिराळे राहतात. तालुका प्रशासनाचा प्रमुख लाच घेताना सापडल्याची घटना दुर्मीळ. राजापुरात नेहमी दुर्मीळ गोष्टीच घडत असतात. तहसीलदार हुन्नरे याला लाच घेताना पकडण्यात आले.कोणतेही काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी आपल्याला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा अधिकच्या रकमेची अपेक्षा करणे गैरच आहे. पण हे संस्कारात असावे लागते. सुशिक्षित संस्कार ज्या घरात होतात, तेथे असल्या प्रवृत्ती वाढत नाहीत. पण जिथे संस्कार होतच नाहीत, अशा ठिकाणी लाचखोरच तयार होतात. निर्लज्जपणे लाच मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. लाच घेताना कितीही माणसे पकडली गेली तरी हे लाचखोर सुधारत नाहीत. पण वाईट गोष्टींना अंत आहे. तसेच हुन्नरेसारख्या माणसांचे होते.राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात चार जणांना लाच घेताना पकडण्यात आले. तरीही पाचवा प्रकार तेवढ्याच बिनदिक्कपणे सुरू होता. या प्रवृत्तीला फक्त बकासुराचीच उपमा देता येईल. गाडाभर अन्नही ज्याला पुरत नव्हते, अशा बकासुराचीच ही वृत्ती. खरं तर सरकारी नोकरीत अधिकृत मार्गानेच पुरेसा पगार मिळतो. त्यापेक्षा कितीतरी कमी वेतनात, उत्पन्नात काम करणारी माणसेही प्रामाणिकपणे काम करतात. पण कितीही आयोग आले आणि कितीही पटींनी पगार वाढले तरी प्रशासनातील ठराविक लोकांकडे असलेली बकासुरी वृत्ती कमी होणार नाही.अशी बकासुरी वृत्ती दोन मार्गांनी संपवता येईल. एकतर अशा प्रवृत्ती ठेचूनच काढायला हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांनीच लाच देणे बंद करायला हवे. तसे पाहिले तर कोणीही लाच देण्याच्या मानसिकतेचे नाहीत. पण अनेकदा अनधिकृत कामे करण्यासाठीही पैसे द्यावे लागतात किंवा अधिकृत पद्धतीने काम करून घेण्यासाठी आवश्यक तितका वेळ देण्याची तयारी सामान्य माणसे दाखवत नाहीत आणि त्यातून सोपा मार्ग म्हणून लाच देण्याचा पर्याय स्वीकारतात. पैसे घे, पण काम करून दे, ही मानसिकता वाढली आहे. ही मानसिकता जेव्हा संपेल, तेव्हाच बकासुरी वृत्तीचा नाश होईल.एखादा सरकारी अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असेल तेव्हा त्याविरोधात साऱ्यांनीच उभे राहायला हवे. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे कौतुकच करायला हवे. गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी कारवाई झाली आहे. ज्यांनी ज्यांनी या कार्यालयाकडे संपर्क साधला, त्यातील प्रत्येक प्रकरणात संबंधित अधिकारी कर्मचारी गजाआड गेला आहे. ही बकासुरी वृत्ती या पद्धतीने ठेचता येईल. पैसे मागणाऱ्या प्रत्येकालाच अशा पद्धतीने जाळ्यात अडकवता येईल. त्यासाठी यंत्रणेने लोकांच्या पाठीशी ठाम उभे राहायला हवे.भ्रष्टाचार ही सरकारी कार्यालयांना लागलेली कीड आहे, असे म्हणतात सगळेजण, पण वेळ आल्यावर कीड ठेचण्यापेक्षा या कीडीला खतपाणी घालायचे काम सर्वसामान्य माणसांकडून केले जाते. चुकीचे काम सुरू आहे, तिथे अर्थपूर्ण डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी सर्वसामान्य माणसांनीच पुढे यायला हवे.जोपर्यंत आग आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत ती विझविण्याचे कष्ट कोणीच घेत नाहीत. जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत नाही, तोपर्यंत मला काय त्याचे, ही वृत्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. अन्याय होत असलेल्या माणसाच्या बाजूने उभे न राहणे ही प्रवृत्तीही अन्याय करणारीच आहे. उद्या हीच वेळ आपल्यावरही येऊ शकते, असे लक्षात घेऊन वेळीच अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची प्रथा सुरू व्हायला हवी. तरच हा बकासूर गाडला जाईल.आतापर्यंत झालेली प्रकरणे लक्षात घेऊन सरकारी अधिकारी आणि कर्मचारी स्वत:हून जागे होतील आणि लाचखोरी बंद करतील, अशी अपेक्षा म्हणजे आता भाबडेपणा किंवा मूर्खपणा ठरेल. हे स्वत:हून बंद होणार नाही. ते बंद करायला भाग पाडायला हवे. यापुढच्या काळात लाच देणाऱ्यांनाही खडी फोडायला पाठवायला हवे. लाच देण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळेच लाच घेणाऱ्यांचे मनोबल वाढले आणि पुढे नियमात काम करून घेणाऱ्यालाही या मार्गाचा बळी व्हावे लागले. अर्थात आतापर्यंत लाच घेताना सापडलेले अधिकारी महसूल खात्याचेच असले तरी दुय्यम निबंधक, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खातीही त्यात मागे नाहीत. त्यांनी वेळीच सावध व्हावे, एवढीच अपेक्षा.
या बकासुरांना ठेचणार कोण?
By admin | Published: September 18, 2015 10:11 PM