सावंतवाडी : १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस तपासणी नाकी बंद करणे म्हणजे पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी पर्यटकांना पोलीस त्रास देतात म्हणून तपासणी नाकी बंद केली म्हणणे दुर्दैवी बाब आहे. ही पोलीस तपासणी नाकी पुन्हा सुरू करा, अशी जोरदार मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. आपल्या जिल्ह्यातील समुद्राची तटबंदी आहे. त्यामुळे कधी काय होईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्या, असेही ते यावेळी म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १५ तपासणी नाकी ही पोलीस अधीक्षकांनी एका रात्रीत बंद केली आहेत. त्यामुळे अनेक पोलीस थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. तसेच तपासणी नाकी बंद झाल्याने कोणाचा कोणाला धाक राहिला नाही.
आता कोणीही थेट जिल्ह्यात कधीही, कोठेही फिरू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे. त्यामुळे समुद्रमार्गे कोणीही, कधीही आपल्या जिल्ह्यात प्रवेश करू शकतात. आपल्याकडे १९९३ च्या बॉम्बस्फोटाचे उदाहरण आहे. त्यानंतरच ही तपासणी नाकी अस्तित्वात आली आहेत. असे असतना अचानक तपासणी नाकी बंद करण्याचा प्रकार काय? असा सवाल आमदार राणे यांनी केला आहे.आमदार नितेश राणे यांनी यावरून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. जिल्ह्यात तपासणी नाकी बंद करून तुम्हाला मोठ्या घटनेला निमंत्रण द्यायचे आहे का? तपासणी नाकी बंद करण्यामागे पोलीस अधीक्षक सांगत आहेत की पोलीस कमी आहेत. तर पोलीस तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या पर्यटकांना पोलीस त्रास देतात. म्हणून आम्ही नाकी बंद केल्याचे सांगतात.
कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे समजायचे. दोघांच्या बोलण्यात मोठी विसंगती आहे, असा आरोप करत पुन्हा तपासणी नाकी सुरू करा, अशी मागणीही आमदार नितेश राणे यांनी केली. तसेच तपासणी नाकी बंद केल्यामुळे पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.