राज्यात विधानसभा निवडमुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण शक्तीनिशी आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दरम्यान, नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. यातच भाजप नेते नारायम राणे यांना यावेळी मोदी मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही? यासंदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी हा दावा करताना एका पत्राचाही हवाला दिला आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले, "दिल्लीतील एका प्रतिष्ठित उद्योग पतीने 14 डिसेंबर 2022, दुपारी बरोबर 1.45 वाजता पंतप्रधान कार्यालयात मेल केला आणि एमएसएमई खात्याच्या माध्यमातून मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन स्वीयसहाय्यक रवि शेडगे आणि स्वप्नील पाटील (ही नावे त्या पत्रात लिहिलेली आहेत.) यांनी कशा पद्धतीने टक्केवारीचा धंदा सुरू केला आहे, हे त्यांनी त्या पत्रात लिहिले आहे. मला खात्री आहे की, पंतप्रधान मोदी यांनी त्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली. म्हणून नारायण राणेंची गच्छंती झाली." तसेच, "तुम्ही कुणीही आरटीआयमधून गेलात, तर पंतप्रधान कार्यालयातून ते पत्र तुम्हाला मिळू शकते," असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे किमान 170 आमदार निवडून येतील - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, या महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान 170 आमदार निवडून आनेल. एवढी आम्हाला खात्री आहे. यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सिंहाचा वाटा असेल.