कणकवली : तब्बल १७ हजार चौरस फुटाचे भाजी मार्केट मोफत बांधून मिळत असेल, तर त्याला नगरसेवकांचा विरोध कशासाठी आहे ? असा सवाल ग्लोबल असोसिएटने उपस्थित केला आहे. तसेच नगरपंचायतीने दिलेल्या मूळ परवानगीनुसारच भाजी मार्केटचे काम सुरू आहे. आम्ही नगरपंचायतीची कोणतीही फसवणूक केलेली नाही, असेही ग्लोबल असोसिएटने म्हटले आहे.कणकवली नगरपंचायतीच्या सोमवारी झालेल्या सभेत भाजी मार्केटप्रश्नी ग्लोबल असोसिएटने फसवणूक केली असल्याचा आरोप नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी केला होता. हे सर्व आरोप ग्लोबल असोसिएटने फेटाळले आहेत.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली नगरपंचायतीमध्ये होणाऱ्या विरोधामुळेच भाजी मार्केट उभारणीच्या कामाला विलंब होत आहे .
कणकवली शहरातील अनेक जमिनींवर आरक्षणे टाकण्यात आली आहेत. यातील फक्त ३ आरक्षणे भागशः पूर्ण झाली आहेत. उर्वरित आरक्षणे निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच भाजी मार्केटचा प्रस्ताव २०१६ मध्ये ग्लोबल असोसिएटने नगरपंचायतीला दिला. मात्र, या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच नगरसेवकांनी विरोध केला.
आडकाठीची भूमिका घेतली. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर नगरपंचायतीने प्रकल्पाला परवानगी दिली. या कालावधीत शासनाची धोरणे बदलली. त्याचा मोठा फटका ग्लोबल असोसिएटला बसला आहे. तरीही राज्यात प्रथमच कणकवली नगरपंचायतीला १७ हजार चौरस फुटाचे भाजी मार्केट मोफत बांधून देण्याचा प्रकल्प होत आहे.सद्यस्थितीत भाजी मार्केटचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे या प्रकल्पाला विलंब झाला. तरीही आम्ही ३ नोव्हेंबर २०२० रोजी भाजी मार्केट पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितलेली आहे.अनाठायी विरोध होता कामा नयेग्लोबल असोसिएटमार्फत सध्या नगरपंचायतीने दिलेल्या मूळ परवानगीनुसारच भाजी मार्केट आणि अन्य इमारतींचे काम सुरू आहे. मात्र, नगरपंचायतीकडून प्रत्येकवेळी अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. आम्ही कणकवली नगरपंचायतीचा एक रुपया देखील खर्च होऊ न देता १७ हजार चौरस फुटाचे भाजी मार्केट बांधून देत आहोत. त्याला अनाठायी विरोध होता कामा नये. तसेच सुरू असलेल्या विकास कामात नाहक अडथळे आणले जाऊ नयेत, असेही आवाहन ग्लोबल असोसिएटने केले आहे.