कणकवली : कणकवली विभागीय वनपरिक्षेत्रातील महामार्गाच्या ठेकेदाराने बेसुमारे वृक्षतोड केली़ आहे. ओसरगाव मध्ये विना परवाना वृक्ष तोड झाली असून त्याची वाहतूक करताना सहा महिन्यांपूर्वी आम्ही ट्रक पकडून दिले. तरी देखील वन विभाग ठेकेदाराला पाठिशी का घालते? वनसंज्ञा असलेल्या क्षेत्रातील किती वृक्षतोड करण्यात आली. या मुद्यांवर मनसे सरचिटणीस माजी आ़मदार परशुराम उपरकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल एस.व्ही.सोनवडेकर यांना धारेवर धरले. विविध मागण्यांचे लेखी आश्वासन त्यांनी दिेल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले.जानवली येथील कार्यालयावर धडक देत कणकवली वनक्षेत्रपाल एस. व्ही. सोनवडेकर यांना परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने सोमवारी जाब विचारण्यात आला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपाध्यक्ष अनंत आचरेकर, गणेश अमृते, अनुपम कांबळी, वनपाल तानाजी दळवी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.ओसरगाव येथील परवाना नसलेले लाकूड पकडल्यानंतर त्या चौकशीसाठी दोन महिने का लागतात? त्याचा अहवाल देण्यास टाळाटाळ का? जर चौकशी झाली असेल तर ठेकेदारावर काय कारवाई केलात ? अशा मुद्यांवर परशुराम उपरकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर १९ नोव्हेंबर पर्यंत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने झालेले पंचनामे व या प्रकरणाचा अहवाल आपल्याला सादर करण्यात येईल, असे सोनवडेकर यांनी उपरकर यांना सांगितले़ .लाकूड तोड करत असताना संबंधित तोडीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रचलित पध्दतीनुसार झाडे तोडल्यानंतर मापे घेऊन वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पास (परवाना )कामासाठी आम्ही सादर करतो़ . त्यानंतर पास मिळाल्यानंतर संबंधित झाडांवर शिक्के मारण्यात येतात, अशी माहिती सोनवडेकर यांनी देताच परशुराम उपरकर यांनी या माहितीवर आक्षेप घेत नियमानुसार ही माहिती खरी असेल तर लेखी द्या, अशी मागणी केली. या मागणीवर सुमारे १ तास ठिय्या मनसे कार्यकर्त्यांनी मांडला़. अखेर लेखी माहिती वरिष्ठांच्या सूचनेनुसार सोनवडेकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिली.यावेळी परशुराम उपरकर यांनी एका पासावर दुसऱ्याच झाडांची वाहतूक केली जाते. ओसरगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात तोडलेल्या लाकडाचा डेपो मारला. त्या ठिकाणी असलेल्या लाकडांवर एकही शिक्का नव्हता. हे तुम्हाला आम्ही दाखवून दिले . तरी देखील तुम्ही कारवाईला टाळाटाळ का करता? संबंधित महामार्गाचा ठेकेदार व तुमचे साटेलोटे आहेत का? असे परशुराम उपरकर यांनी विचारले.तसेच वनसंज्ञा क्षेत्रातील वृक्षतोड करण्याचे आदेश जरी असले तरी ३२ अटी शर्तींची पूर्तता झाली का? ही अटीशर्तींचा पूर्तता न करताच वनसंज्ञा परिक्षेत्रातील वृक्षतोड झालेली आहे.अशी नऊ झाडे तोडण्यात आली असल्याने संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही उपरकर यांनी यावेळी केली. आमच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केला असून सावंतवाडी वनविभाग कार्यालयावर १९ नोव्हेंबर रोजी मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा परशुराम उपरकर यांनी यावेळी दिला.
सिंधुदुर्ग : बेसुमार वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी का घालता ?; मनसेने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:42 PM
मनसे सरचिटणीस माजी आ़मदार परशुराम उपरकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल एस.व्ही.सोनवडेकर यांना धारेवर धरले. विविध मागण्यांचे लेखी आश्वासन त्यांनी दिेल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले.
ठळक मुद्देबेसुमार वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी का घालता ?कणकवली वनक्षेत्रपालांना मनसेने विचारला जाब; मोर्चा काढण्याचा दिला इशारा