वैभववाडी : कोविडचे रुग्ण वाढत असताना ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर नाही. रुग्ण तपासणीसाठी प्रतिनियुक्तीवर दिलेले डॉक्टरसुद्धा नेत्रतज्ज्ञ आहेत. ते अन्य रुग्णांची तपासणी करणार कशी? असे प्रश्न उपस्थित करीत रुग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल, तर रुग्णालयाला टाळे ठोकायचे का? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी केला.येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार राणे यांनी दुपारी भेट देत आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सावी लोके, शारदा कांबळे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, डॉ. सोनवणे आदी उपस्थित होते.राणे यांनी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर किती आहेत? असा प्रश्न केला असता, सध्या कणकवली रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. सोनवणे हे प्रतिनियुक्तीवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राणे हे संतप्त झाले. राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
जिल्ह्यातसुद्धा सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु कोरोनाशी लढताना मुख्य भूमिका असलेल्या विभागाची स्थितीच भयंकर आहे. डोळ्याचे डॉक्टर रुग्णांच्या पायावर कसा उपचार करतील? असा खोचक प्रश्न करीत राज्य शासनच गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.राणे यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक गावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यांनाही त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून जाब विचारला. राजीनामा देऊन गेलेले डॉ. धर्मे यांच्याशी त्यांनी संपर्क साधून त्यांना काम करा, असा आग्रह त्यांनी धरला. याशिवाय विविध मुद्द्यांबाबत आजच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.पालकमंत्री विशेष कारणासाठी येतातग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून रिक्त पदाची माहिती घेतल्यानंतर आमदार राणे यांनी ही यादी माझ्याकडे देण्यापेक्षा पालकमंत्र्यांकडे द्या. परंतु ते तुम्हांला भेटणार नाहीत. त्यांना वेळ नाही. ते वैभववाडीत विशेष कारणानेच येतात, असा टोला त्यांनी लगावला.