कणकवली : कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांसाठी नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात पती गमावलेल्या विधवा महिलांना २५ हजाराचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक अभिजीत मुसळे, महेश सावंत, बंडू गांगण आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून या अर्थसहाय्यातून महिलांनी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी नगरपंचायतचा हा प्रयत्न आहे. बहुदा जिल्ह्यात असा निर्णय घेणारी कणकवली ही सर्वप्रथम नगरपंचायत असणार आहे.ज्या महिलांच्या पतीचे कोविडने निधन झाले अशा महिलांचे मतदार यादी मध्ये नाव असावे. त्याचबरोबर रेशन कार्ड व आधार कार्ड हे कणकवली शहरातील असण्याची गरज आहे. या उपक्रमा बाबत माहिती देण्याकरिता व कागदपत्रे संकलनाकरिता कणकवली नगरपंचायत कार्यालयामध्ये एक विशेष कक्षाची स्थापना करण्यात आल्याचेही नलावडे यांनी सांगितले.मेघा गांगण म्हणाल्या, कणकवली शहरातील कोविड काळात वैधव्य आलेल्या महिलांनी या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करावा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सक्षमपणे करण्यासाठी हातभार लावावा.
कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय
By सुधीर राणे | Published: August 25, 2022 3:37 PM