दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या गोवा राज्यातील साळ व इब्रामपूर येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याने भविष्यात तिलारी नदीचे पात्र रुंदावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आतापासूनच त्याची झळ, मणेरी, कुडासे येथील नदीकाठालगतच्या केळी बागायतदारांना बसू लागली आहे. दोडामार्ग तालुक्यात उगम पावलेली तिलारी नदी गोवा राज्यासाठी वरदान ठरली आहे. तिलारी कोनाळकट्टा, कुडासे, मणेरी या भागातून वाहत जाणारी ही नदी पुढे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जात गोवा राज्यात जाऊन अरबी समुद्राला मिळते. दोडामार्ग तालुक्याला लागूनच असलेल्या साळ व इब्रामपूर या गोवा राज्यातील दोन गावांना तर या नदीचे पाणी वरदान ठरले आहे. या भागात सिमेंट काँक्रीटची कामे जास्त असल्याने वाळूला मोठी मागणी आहे. नदीपात्रातून काढलेली वाळू बांधकाम करतेवेळी फाऊंडेशनच्या कामासाठी वापरली जाते. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षात वाळू उपसा करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्याचा विपरित परिणाम दोडामार्ग तालुक्यावर होत आहे. अमर्याद वाळू उपसामुळे नदीचे पात्र रूंदावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सीमावर्ती भागातील मणेरी येथील दोडामार्ग-बांदा रस्त्यावरील फुलाजवळ नदीपात्र रूंदावत चालले आहे. येथील नदी काठालगतची जमीन पावसाळ्यात पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह गिळंकृत करू लागला. त्यामुळे भविष्यात नदीकाठालगत ज्या शेतकऱ्यांनी केळी बागायती फुलविल्या आहेत त्या धोक्यात येणार आहेत. भविष्यात होणारे हे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे असून गोव्यातील वाळू व्यावसायिकांवर अंकुश लावणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)साळ, इब्रामपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसाबारमाही वाहणाऱ्या या नदीच्या पाण्यावर या भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. वर्षानुवर्षाची ही परंपरा आजही कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून साळ व इब्रामपूर येथे तिलारी नदीपात्रात गोव्यातील व्यावसायिकांकडून तेथील प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केली जात आहे.
रुंद नदीपात्राचा बागायतदारांना फटका
By admin | Published: December 24, 2014 9:31 PM