अनंत जाधव सावंतवाडी : वन्य प्राण्यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांचा मार्ग निश्चित करण्याच्या कामाला गती आली आहे. हा वन्य प्राणी कॉरिडॉर सिंधुदुर्गातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट, केसरी, फणसवडे, सोनवडे, घोडगे असे करीत कडावलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याला जोडला जाणार आहे.मात्र, या मार्गाची निश्चिती अद्याप झाली नसून, कॉरिडॉरच्या जागेच्या निश्चितीबरोबरच सीमा निश्चितीचे काम राज्य सरकारने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेला दिले आहे. या अभ्यासासाठी ८४ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५८ लाख रुपये देण्यात आले आहेत. या कामाची प्रत्यक्ष सुरुवात या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात वाईल्डलाईफ संस्थेचे सदस्य करणार आहेत.२०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा कॉरिडॉर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य शासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.यात जिल्ह्यातील तिलारीपासून दोडामार्ग, तळकट त्यानंतर केसरी, फणसवडे, घोडगे, सोनवडे, कडावल व त्यानंतर हा मार्ग कोल्हापुरातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडला जाणार आहे.
दोडामार्ग तिलारीला दांडेली अभयारण्याचा काही भाग लागत असल्याने तो कर्नाटकला जोडला जाणार आहे. यात भीमगड अभयारण्याशी जोडला जाईल. या कॉरिडॉरला सध्या खाण प्रकल्पांमुळे धोका निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक नितीन काकोडकर यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी ८४ लाख रुपये मंजूर केले असून लवकरच हा अभ्यास सुरू होईल.वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट या भागातील हत्ती व वाघांच्या हालचालीसाठी संभाव्य कॉरिडॉर निश्चित करणार आहे. संस्थेचे वैज्ञानिक बिलाल हबीब म्हणाले की, हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. आम्ही दोन शास्त्रज्ञ नियुक्त करू. ते कॉरिडॉरचा नकाशा तयार करतील आणि या दोन तालुक्यातील गावे कॉरिडॉरमध्ये येत आहेत की नाहीत आणि ते इको सेन्सिटिव्ह झोनचा भाग म्हणून घोषित करण्याची गरज आहे का ते तपासतील. आम्ही या कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या मानवी अडचणींचेही मूल्यांकन करणार आहोत, असे ते म्हणाले.न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार वन विभाग, शासनाने पूर्तता केली आहे. इको सेन्सिटिव्ह, जैवविविधता, पशुपक्षी अशा विविध क्षेत्राचा अभ्यास होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे खाण प्रकल्प, रेड झोनमधील प्रकल्प या अहवालानुसार स्पष्ट होतील. खाण प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय यामुळे पुढील काळात सरकार निश्चितच घेईल किंवा नाही हे ठरणार आहे. खाण प्रकल्प मालक मात्र सक्रिय होतील, अशी चर्चा आहे.शासनाकडून अभ्यासासाठी ८४ लाख रुपये मंजूर : चव्हाणवन्य प्राण्यांचा कॉरिडॉर हा प्रामुख्याने सिंधुदुर्गमधून जाणार असून त्यासाठी सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. हे काम वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेला देण्यात आले असून दोडामार्ग तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्षेत्राचाही संस्था अभ्यास करणार आहे. त्यासाठी ८४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ५८ लाख रुपये मार्च महिन्यात जमा झाले आहेत, असे सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.