रहिम दलाल -रत्नागिरी -जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५९७ साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. या साकवांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनकडे निधीची तरतूद नसल्याने गेली दोन वर्षे दुरुस्तीचा प्रस्ताव पडून आहे. येत्या पावसाळ्याच्या आधी या साकवांची दुरुस्ती न झाल्यास शेकडो गावांचा संपर्क तुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिकाणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावरुन ये-जा करण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या साकवांची स्थिती दयनीय झाली असून, ते मोडकळीस आले आहेत. हे साकव मोडकळीस आल्याने धोकादायक स्थितीत असल्याने त्यावरुन जीव हातात घेऊन ग्रामस्थ ये-जा करतात.वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागवले होते. जिल्हाभरातून साकवांचे ५९७ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते. या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ७८ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, जिल्हा नियोजन विभागाकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी तरतूद नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. दीड वर्ष उलटले तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धूळखात पडून आहे. जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या दुरुस्तीबाबत वारंवार विचारणा करण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याला अजिबात प्रतिसाद देण्यात आलेला नाही.सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषदेने शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्याकडून दुरुस्तीसाठी प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे साकवांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी मिळेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.निर्माण होणार हजारो ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्ननादुरुस्त साकवांमुळे पावसाळ्यात येथील रहिवाशांचे हाल होतात. या साकवावरुन जीव मुठीत धरुन रहदारी करीत असतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या साकवांची दुरूस्ती न झाल्यास रहिवाशांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण होणार आहे.जिल्ह्यातील दुरूस्ती अपेक्षितअसलेले तालुकानिहाय साकवतालुकानादुरुस्त साकवमंडणगड२२दापोली४३खेड८३चिपळूण९०गुहागर४९संगमेश्वर६०रत्नागिरी४३लांजा१०६राजापूर७१एकूण५९७साकव दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने नियोजन विभागाकडे निधीची मागणी केली आहे. मात्र, साकव दुरुस्तीसाठी निधीची तरतूदच नाही. त्यामुळे साकवांच्या दुरुस्तीचा लेखाशीर्ष निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे लेखाशीर्ष निर्माण केल्याशिवाय साकवांच्या दुरुस्तीवर एकही पैसा खर्च करता येणार नाही.
वाड्या होणार ‘जगावेगळ्या’
By admin | Published: May 14, 2015 10:29 PM