लांजा : सार्वजनिक बांधकाम विभागाची वेरवली कोंड येथे डांबराची ४२ पिंपे सापडली असून, ही घटना लज्जास्पद आहे. या प्रकरणाच्या मागे जे कोणी असतील त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश लांजा - राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिले आहेत.ही पिंपे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आॅगस्ट २०१४ रोजी खरेदी करण्यात आली होती. खरेदी करुन तब्बल एक वर्ष उलटून गेले तरी या डांबराचा वापर कोणत्याही रस्त्यावर न केल्याने २७ पावसाळी डांबराची पिंपे मुदत संपल्यामुळे फुकट गेली आहेत. लांजा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याने हे खड्डे भरण्यासाठी गेल्यावर्षी हे डांबर मागवण्यात आले होते. मात्र, या डांबराचा कोणत्याही खड्ड्यावर वापर न करता वेरवली कोंड येथे ते साठवून ठेवण्यात आले होते.जागृत नागरिकांच्या हा डांबरसाठा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. बोबडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी याबाबत लांजा पोलिसात चौकशी अर्ज दाखल केला आहे.वेरवली कोंड येथे उन्हाळी १५ व पावसाळी २७ डांबराची पिंपे आढळून आली. कार्यकारी अभियंता बोबडे यांनी ही ४२ पिंपे जप्त करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लांजा कार्यालयात आणून ठेवली. लांजा तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असतानाही मोठ्या प्रमाणात डांबराचा साठा सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रविवारी आमदार राजन साळवी लांजा येथे आले असता माझ्या मतदार संघात अशी गैरकृ त्य खपवून घेतली जाणार नाहीत, असे सांगितले. या डांबर प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची पोलीस खात्यामार्फत चौकशी करुन त्याचा अहवाल आठ दिवसात सादर करण्यात यावा, असा आदेश कार्यकारी अभियंता एस. आर. बोबडे यांना दिला आहे. (प्रतिनिधी)वेरवली कोंड : विनावापराने डांबर फुकट---डांबराची एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही त्याचा वापरच करण्यात आलेला नाही. याबाबत आमदार राजन साळवी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने आता या चौकशीत कोण दोषी ओढळतो, याबाबत चर्चांना ऊत आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने ही पिंपे का मागवण्यात आली आणि ती विनावापर का ठेवण्यात आली? हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.दोषींवर कारवाईआमदार राजन साळवी यांनी येत्या आठ दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने दोषींवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
डांबरातील ‘काळे’ बाहेर येणार?
By admin | Published: October 18, 2015 10:38 PM