मालवण : शांततेच्या मार्गाने आम्ही ‘सी वर्ल्डविरोधी’ लढा सुरू ठेवला आहे. हा लढा असाच पुढे सुरू राहणार आहे. सी वर्ल्ड आम्हाला कोणत्याही स्वरूपात नको आहे. यासाठी आम्ही एक इंचसुद्धा जागा देणार नाही, अशी भूमिका तोंडवळी-वायंगणी ग्रामस्थांनी घेतली. यावेळी लोक सुखी होणार नसतील तर विकास काय कामाचा, असे सांगत सी वर्ल्ड प्रकल्प लोकांच्या माथी मारला जाणार नाही. शिवसेनेचा सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोधच राहील, असे खासदार विनायक राऊत यांनीही या बैठकीत स्पष्ट केले.वायंगणी येथील श्री देव गांगो मंदिरात तोंडवळी वायंगणी सी वर्ल्डविरोधी गाव बचाव समितीची बैठक आज, रविवारी झाली. या बैठकीला खासदार विनायक राऊत यांना बोलविण्यात आले होते. सुरुवातीला गाव बचाव समितीच्या सदस्यांनी सी वर्ल्डबाबत आपली भूमिका मांडली. आमच्या ग्रामस्थांवर हद्दपारी, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी केसेस दाखल करून अडकविण्याचा सरकारचा डाव होता. मात्र, सुरुवातीपासूनच शांततेच्या मार्गाने आम्ही लढा सुरू ठेवला असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.हद्दपारीची वेळ त्यांच्यावरच सी वर्ल्डला विरोध करणाऱ्यांना हद्दपार करू म्हणणाऱ्यांवरच आता हद्दपार व्हायची वेळ आल्याचे पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे म्हणाले. आम्ही सी वर्ल्डविरोधीचा लढा गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरातून सुरू केला आहे. सी वर्ल्ड होणारच असे पालकमंत्री नारायण राणे म्हणतात. सी वर्ल्डला विरोध करणाऱ्यांच्या जमिनी कुठे आहेत असे त्यांचे म्हणणे असेल, तर सी वर्ल्ड डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी इथल्या जमिनी खरेदी केल्या आहेत ते कोण आहेत, हे सुद्धा जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असे दुखंडे म्हणाले.यावेळी खासदार राऊत म्हणाले की, येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी, त्यांना सोयी-सुविधा मिळण्यासाठी नारायण राणेंना प्रकल्पात जागा वाढवून हवी आहे. त्यांनी अगोदर वेंगुर्ला, मिठबांव, चिपी विमानतळ, आदी ठिकाणच्या जागा धनदांडग्यांच्या घशात घातल्या. तेथे पर्यटकांना जागा उपलब्ध करून द्यावी. खरा सी वर्ल्ड प्रकल्प ३८१ एकर जागेमध्ये असून, मालवणमध्ये दाखविलेले सी वर्ल्ड प्रकल्पाचे सादरीकरण काल्पनिक असल्याचे प्रकल्पाचे आरेखक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी आपल्याकडे कबूल केल्याचेही खासदार राऊत म्हणाले. (पान ७ वर)
‘सी वर्ल्ड’विरोधी लढा सुरूच ठेवणार
By admin | Published: August 31, 2014 10:54 PM